सावंतवाडी : विनयभंग, मारहाण आणि अश्लील शिवीगाळ केल्याच्या आरोपांमुळे चर्चेत आलेल्या प्रकरणात संशयित ऑगस्टिन लोबो यांना न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे. सरकारी पक्षाकडून करण्यात आलेले आरोप ठोस पुराव्यांच्या अभावामुळे सिद्ध होऊ शकले नाहीत. बचाव पक्षाने केलेला प्रभावी युक्तिवाद आणि तपासातील त्रुटी न्यायालयासमोर मांडल्यानंतर हा महत्त्वपूर्ण निकाल देण्यात आला.
या प्रकरणातील फिर्यादी महिला या कुडाळ तालुक्यातील आरोस, ख्रिश्चनवाडी येथील रहिवासी आहेत. गणपती सणानिमित्त त्यांचे पती व मुले मुंबई आणि पुण्याहून गावी आली होती. दरम्यान, ३१ ऑगस्ट २०२२ रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास फिर्यादी महिला घराच्या अंगणात झाडलोट करत असताना ऑगस्टिन लोबो याने रस्त्यावर उभे राहून त्यांना घाणेरडे शब्द बोलल्याचा आरोप करण्यात आला होता. महिलेने विरोध केला असता त्याने अश्लील शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत नमूद होते.
त्यानंतर महिलेने पती व मुलाला बोलावून घेतले असता आरोपीने मुलाच्या अंगावर धावून जात त्याला खाली पाडल्याचा आरोप करण्यात आला होता. यावेळी घटनास्थळी उपस्थित प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी दोघांची सोडवणूक केली. या घटनेप्रकरणी सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात ऑगस्टिन लोबो याच्याविरोधात फिर्याद दाखल करण्यात आली होती.
न्यायालयात सरकारी पक्षाचा दावा ठरला कमकुवत –
या खटल्याच्या सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाकडून साक्षीदार तपासण्यात आले. मात्र, आरोपीचे वकील ॲड. अशपाक शेख यांनी फिर्यादी आणि सरकारी पक्षाने केलेले विनयभंग, मारहाण व शिवीगाळीचे आरोप कथित घटनेशी संबंधित कोणत्याही स्वतंत्र किंवा त्रयस्थ प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराच्या साक्षीतून सिद्ध झाले नसल्याचा मुद्दा प्रभावीपणे मांडला.
विशेष म्हणजे, आरोपीला मारहाण केल्याचा आरोप असताना त्यासंदर्भातील ठोस पुरावा न्यायालयासमोर सादर करण्यात आला नसल्याचे बचाव पक्षाने निदर्शनास आणून दिले. तसेच दोन्ही पक्षांमध्ये पूर्वीपासून दिवाणी स्वरूपाचे वाद असल्याची बाबही न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आली. तपासातील गंभीर त्रुटी आणि साक्षी-पुराव्यांमधील विसंगती यावरही बचाव पक्षाने बोट ठेवले.
अखेर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल!
बचाव पक्षाचा युक्तिवाद आणि तपासातील त्रुटी विचारात घेऊन आरोस येथील मा. मुख्य न्याय दंडाधिकारी श्री. अवधूत गजानन देशिंगकर यांनी दिनांक १६ नोव्हेंबर २०२६ रोजी ऑगस्टिन लोबो यांची निर्दोष मुक्तता करण्याचा आदेश पारित केला.
या प्रकरणात आरोपीच्या वतीने ॲड. अशपाक शेख यांनी प्रभावी युक्तिवाद केला. त्यांना ॲड. नामदेव मठकर, ॲड. विनय राजपूत, ॲड. कैस शेख, ॲड. भूषण कदम, ॲड. हरेश वराडकर आणि ॲड. आसिम मुजावर यांनी सहकार्य केले.
पुराव्यांच्या कसोटीवरच न्यायदानाचा अंतिम निर्णय अवलंबून असतो, याची प्रचिती या निकालातून पुन्हा एकदा आली आहे.



