सावंतवाडी : गोवा बनावटीच्या दारूची बेकायदा विक्री करण्याच्या उद्देशाने साठा बाळगणाऱ्या एका तरुणावर सावंतवाडी पोलिसांनी कारवाई केली. आरोंदा चेकपोस्ट येथे गुरुवारी (ता. १९) सकाळी करण्यात आलेल्या या कारवाईत ९ हजार ६०० रुपये किमतीच्या गोवा बनावटीच्या दारूच्या ९६ सिलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या. याप्रकरणी आयवान संतान फर्नांडिस (वय ३३, रा. आरोंदा बाजारपेठ, ता. सावंतवाडी) याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास आरोंदा चेकपोस्ट येथे ही कारवाई करण्यात आली. यावेळी आरोपी आयवान फर्नांडिस हा गोवा बनावटीची दारू विक्री करण्याच्या उद्देशाने बेकायदा साठा बाळगून असल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्याच्याकडील प्लास्टिकच्या गोणीतील दोन पुठ्ठ्यांचे बॉक्स तपासले असता, त्यामध्ये ‘गोल्डन एस ब्लू’ (GOLDEN ACE Blue) असे इंग्रजी लेबल असलेल्या १८० मिली क्षमतेच्या एकूण ९६ दारूच्या बाटल्या आढळल्या. प्रत्येकी १०० रुपये किमतीप्रमाणे या दारूसाठ्याची एकूण किंमत ९ हजार ६०० रुपये आहे.
या प्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३१०/२०२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम ३५(३) प्रमाणे नोटीस देण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, संबंधित आरोपीविरुद्ध यापूर्वीही सावंतवाडी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ (ई) अन्वये २०२१, २०२३ आणि २०२४ मध्ये गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ही कारवाई पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली आरोंदा पोलीस दुरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक श्री. अरवारी व पोलीस अंमलदार बाबुराव नकुळ यांनी केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अरवारी करीत आहेत.



