तळवडेत ‘दीपोत्सव २०२६’ उत्साहात!, दोन दिवस दशावतारी नाट्यप्रयोगांची रसिकांना पर्वणी! ; तळवडे व्यापारी संघटनेचा स्तुत्य सांस्कृतिक उपक्रम. ; दशावतार मंडळांच्या मालकांचा विशेष सन्मान!

सावंतवाडी : दीपावलीच्या मंगलमय पर्वाचे औचित्य साधून तळवडे व्यापारी संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दोन दिवसीय ‘दीपोत्सव २०२६’ सोहळा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाला. १६ व १७ नोव्हेंबर रोजी तळवडे गेट येथे पार पडलेल्या या सांस्कृतिक महोत्सवात दोन पौराणिक दशावतारी नाट्यप्रयोगांची मेजवानी रसिकांना अनुभवायला मिळाली. पारंपरिक दशावतारी कलेचा जागर आणि कोकणच्या सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडविणाऱ्या या उपक्रमाला नाट्यप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कोकणच्या समृद्ध लोककलेचा वारसा जतन करणे, पारंपरिक दशावतारी कलेला प्रोत्साहन देणे आणि नव्या पिढीपर्यंत या लोककलेचे महत्त्व पोहोचविणे या उद्देशाने तळवडे व्यापारी संघटनेने या दीपोत्सवाचे आयोजन केले होते. मनोरंजनासोबतच धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचा अनोखा संगम या निमित्ताने अनुभवायला मिळाला.

या दीपोत्सवाचा शुभारंभ व्यापारी संघाचे अध्यक्ष संदीप पेडणेकर यांच्या हस्ते करण्यात आला. पहिल्या दिवशी सोमवार, १६ नोव्हेंबर रोजी मामा-मोचेमाडकर दशावतार कंपनी, मोचेमाडकर यांचा ‘अनघा लक्ष्मी व्रत’ हा पौराणिक दशावतारी नाट्यप्रयोग सादर करण्यात आला. भक्ती, श्रद्धा आणि पौराणिक कथानकाची प्रभावी मांडणी यामुळे या प्रयोगाने उपस्थित रसिकांची मने जिंकली.

तर दुसऱ्या दिवशी मंगळवार, १७ नोव्हेंबर रोजी भास्कर वैद्य प्रस्तुत जय संतोषी माता दशावतार मंडळ, मातोंड-पेंडूर यांचा ‘नृसिंह अवतार’ हा पौराणिक नाट्यप्रयोग रंगला. कलाकारांचा दमदार अभिनय, संवादफेक, पारंपरिक संगीत आणि नेत्रदीपक सादरीकरण यामुळे नाट्यप्रयोगाला रसिकांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली. दोन्ही दिवस तळवडे परिसरातील नागरिकांसह दशावतारप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली.

दशावतार मंडळांच्या मालकांचा विशेष सन्मान

या सांस्कृतिक सोहळ्यादरम्यान दशावतारी लोककलेचा वारसा जतन करून तो पुढे नेणाऱ्या दशावतार मंडळांच्या मालकांचा विशेष सन्मान करण्यात आला. पारंपरिक कलेच्या संवर्धनासाठी योगदान देणाऱ्या कलाकार आणि मंडळांचे कौतुक करून त्यांच्या कलेला प्रोत्साहन देण्याचा स्तुत्य प्रयत्न व्यापारी संघटनेने केला.दीपोत्सवाच्या निमित्ताने मामा-मोचेमाडकर दशावतार कंपनीचे मालक अमेय मोचेमाडकर व जय संतोषी माता दशावतार मंडळ, मातोंड-पेंडूर यांचा तळवडे व्यापारी संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाला व्यापारी संघाचे अध्यक्ष संदीप पेडणेकर, उपाध्यक्ष सनम कासार, सचिव केशव तुळसकर, खजिनदार उमेश पालकर, तसेच ज्येष्ठ व्यापारी प्रशांत पडते, उदय परब, सुधीर गावडे, काका वराडकर, बंटी वराडकर, समीर परब,सदगुरू डिचोलकर,रामचंद्र कुडाळकर,यांच्यासह अन्य व्यापारी बांधव उपस्थित होते.

तळवडे व्यापारी संघटनेने आयोजित केलेल्या या दोन दिवसीय दीपोत्सवामुळे परिसरात सांस्कृतिक वातावरण निर्माण झाले. केवळ व्यावसायिक उपक्रमांपुरते मर्यादित न राहता सामाजिक आणि सांस्कृतिक बांधिलकी जपत स्थानिक लोककलेला व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा संघटनेचा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद ठरला. अशा उपक्रमांमुळे कोकणची दशावतारी लोककला अधिक समृद्ध होण्यास निश्चितच हातभार लागणार आहे. कार्यक्रमाचे प्रस्ताविक उदय परब यांनी केले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles