सावंतवाडी : त्रिपुरारी पौर्णिमेच्या चंद्रमय रात्रीला सुरांच्या सुगंधाची जोड लाभली की वातावरणातील प्रत्येक क्षण अधिकच सुरेल होऊन जातो. चांदण्यांची शीतल बरसात, संगीताचे स्वरमाधुर्य आणि रसिकांच्या मनातील कलासक्त भावनांचा सुंदर मिलाफ अशा प्रसन्न वातावरणात सावंतवाडीत ‘हे चांदणे फुलांनी’ या बहुचर्चित संगीत मैफलीच्या नवव्या पर्वाचा दिमाखदार शुभारंभ झाला. शिवसेना जिल्हाप्रमुख, सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक संजू परब यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून या संगीत सोहळ्याचे उद्घाटन करण्यात आले.

सद्गुरू संगीत कला व सांस्कृतिक मंडळ, सावंतवाडी आणि सावंतवाडी नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त या विशेष संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. ‘हे चांदणे फुलांनी’ या नावातच सामावलेली काव्यमयता आणि संगीताची भावमधुर अनुभूती या मैफलीच्या माध्यमातून रसिकांना अनुभवायला मिळणार आहे.
या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी महिला बालकल्याण समिती सभापती तथा नगरसेविका दीपाली भालेकर, प्राध्यापक गोवेकर सर, ज्येष्ठ कवी दादा मडकईकर, सद्गुरू संगीत कला व सांस्कृतिक मंडळाचे प्रमुख निलेश मेस्त्री, किशोर सावंत आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली. यावेळी सद्गुरू संगीत विद्यालयाचे नामांकित व यशस्वी विद्यार्थीही उपस्थित होते.
संगीत ही केवळ मनोरंजनाची कला नसून ती मनाला प्रसन्न करणारी, भावनांना स्पर्श करणारी आणि माणसामाणसांतील नात्यांना सुरांच्या धाग्यांनी गुंफणारी अनुभूती आहे. अशा संगीत कलेचा वारसा जपत सद्गुरू संगीत कला व सांस्कृतिक मंडळाने आयोजित केलेल्या या मैफलीने सावंतवाडीच्या सांस्कृतिक वैभवात आणखी एक देखणे पान जोडले आहे.
त्रिपुरारी पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशात स्वरांचे मोती ओघळत असताना ‘हे चांदणे फुलांनी’च्या नवव्या पर्वाने संगीतप्रेमींच्या मनात आनंदाची सुरेल लहर निर्माण केली. चांदण्यांनी सजलेली रात्र, सुरांनी बहरलेले वातावरण आणि रसिकांच्या मनात दरवळणारा संगीताचा गंध… अशा अविस्मरणीय वातावरणात या मैफलीचा प्रारंभ खऱ्या अर्थाने सुरेल पर्वणी ठरला!



