कळसुलकर हायस्कूल ते विधानसभा अध्यक्षांच्या निवासस्थानापर्यंतचा नाला होणार बंदिस्त! ; आमदार केसरकरांच्या प्रयत्नांना यश!, तब्बल ६० लाखांच्या विकासकामाचे भूमिपूजन संपन्न.

सावंतवाडी : शहराच्या विकासाला नवी दिशा देणाऱ्या आणि नागरिकांच्या दैनंदिन समस्यांना दिलासा देणाऱ्या आणखी एका महत्त्वपूर्ण विकासकामाचा आज शुभारंभ झाला. सावंतवाडी नगरपरिषद हद्दीतील कळसुलकर हायस्कूल ते महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या निवासस्थानापर्यंत जाणारा नाला बंदिस्त करण्याच्या कामाचे भूमिपूजन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांच्या प्रयत्नातून नगरविकास खात्याकडून या कामासाठी तब्बल ६० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

शहरातील पायाभूत सुविधांना बळकटी देतानाच नागरिकांच्या सोयी-सुविधांना प्राधान्य देणाऱ्या या विकासकामामुळे परिसरातील रहिवासी आणि विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. नाला बंदिस्त झाल्यानंतर या मार्गावरील वाहतुकीची कोंडी कमी होण्यास मदत होणार असून, नागरिकांना ये-जा करण्यासाठी अधिक सोयीस्कर मार्ग उपलब्ध होणार आहे. त्यामुळे या विकासकामाकडे परिसराच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून पाहिले जात आहे.

या कामाचा शुभारंभ स्थानिक नगरसेवक देव्या सूर्याजी यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी नगरसेविका शर्वरी धारगळकर, ज्येष्ठ नागरिक श्री. शिरवलकर आणि नागरिक प्रसाद वागळे यांच्या हस्ते गाऱ्हाणे घालून, श्रीफळ वाढवून भूमिपूजनाची विधीवत सुरुवात करण्यात आली.

या विकासकामासाठी नगरविकास खात्याकडून निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल नगरसेवक देव्या सूर्याजी यांनी नगरविकास मंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि आमदार दीपक केसरकर यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.

नागरिकांच्या सोयीचा मार्ग, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला आधार आणि शहराच्या विकासाला नवी गती अशा त्रिसूत्रीचा संगम या कामातून साधला जाणार आहे. सावंतवाडी शहराच्या विकासप्रवासात आणखी एक सकारात्मक पाऊल पडल्याने स्थानिक नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

यावेळी नगरसेवक देव्या सूर्याजी, नगरसेविका शर्वरी धारगळकर, सौ. शिरवलकर, सौ. वागळे, श्रेयस मूंज, प्रवीण देऊलकर, सागर मठकर, गणेश कुडव, अक्षय शिरवलकर, यल्लापा दोडमणी, पियुष राठोड, कंत्राटदार निमिष परांजपे तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles