शहीद जवानांच्या स्मृतीप्रित्यर्थ सावंतवाडीत ६ डिसेंबर रोजी भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन. ; विविध वयोगटांसाठी होणार स्पर्धा, विजेत्यांना आकर्षक रोख पारितोषिके.

सावंतवाडी : देशाच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शूर शहीद जवानांना समर्पित भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन रविवार, दिनांक ६ डिसेंबर २०२६ रोजी सावंतवाडी येथे करण्यात आले आहे. सिंधुदुर्ग सैनिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, आंबोली आणि कॅथलिक अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. जनरल जगन्नाथराव भोसले उद्यान, सावंतवाडी येथून सकाळी ६ वाजता स्पर्धेला सुरुवात होणार आहे.

विद्यार्थ्यांमध्ये तसेच युवक-युवतींमध्ये शारीरिक तंदुरुस्ती, आरोग्यविषयक जागरूकता आणि क्रीडासंस्कृती वाढीस लागावी, हा या आयोजनामागील प्रमुख उद्देश आहे. त्याचबरोबर देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शहीद जवानांच्या त्यागाचे स्मरण करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे आणि युवकांमध्ये देशप्रेमाची भावना जागृत करणे, या उद्देशाने ही मॅरेथॉन स्पर्धा शहीद जवानांना समर्पित करण्यात आली आहे.

या स्पर्धेमध्ये पुरुष, महिला तसेच विविध वयोगटांतील मुला-मुलींना सहभागी होता येणार आहे. स्पर्धेमध्ये एकूण सात गटांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये ओपन १८ वर्षांवरील पुरुष गटासाठी २१ कि.मी., ओपन महिला गटासाठी ११ कि.मी., १७ वर्षांखालील मुलांसाठी ११ कि.मी., १४ वर्षांखालील मुलांसाठी ६ कि.मी., १४ वर्षांखालील मुलींसाठी ४ कि.मी., तर १० वर्षांखालील मुले व मुलींसाठी प्रत्येकी २ कि.मी. अंतराची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

स्पर्धेचे मार्गही निश्चित करण्यात आले असून, सावंतवाडी गार्डन येथून विविध मार्गांवरून धावपटूंना धावण्याची संधी मिळणार आहे. काही गटांसाठी कोलगाव, कोलगाव तिठा, कोलगाव ग्रामपंचायत तसेच कोलगाव चर्च या मार्गांचा समावेश आहे. लहान मुला-मुलींच्या गटांसाठी मोती तलाव परिसरात फेरीचे आयोजन करण्यात आले आहे.

या मॅरेथॉन स्पर्धेचे प्रमुख आकर्षण म्हणजे विजेत्यांसाठी ठेवण्यात आलेली आकर्षक रोख पारितोषिके. ओपन १८ वर्षांवरील पुरुष गटासाठी प्रथम क्रमांकास १०,००० रुपये, द्वितीय क्रमांकास ७,००० रुपये व तृतीय क्रमांकास ३,००० रुपये पारितोषिक देण्यात येणार आहे. ओपन महिला गटासाठी अनुक्रमे प्रथम ७,०००, द्वितीय ५,००० व तृतीय २,००० रुपये, तर १७ वर्षांखालील मुलांच्या गटासाठीही अनुक्रमे प्रथम ७,०००, द्वितीय ५,००० व तृतीय २,००० रुपये पारितोषिके ठेवण्यात आली आहेत.

१४ वर्षांखालील मुलांच्या गटासाठी प्रथम ५,०००, द्वितीय ३,००० व तृतीय २,००० रुपये, तर १४ वर्षांखालील मुलींच्या गटासाठी अनुक्रमे प्रथम ४,०००, द्वितीय २,००० व तृतीय १,५०० रुपये पारितोषिके देण्यात येणार आहेत. तसेच १० वर्षांखालील मुले व मुली या दोन्ही गटांसाठी प्रथम २,०००, द्वितीय १,५०० व तृतीय १,००० रुपये अशी रोख पारितोषिके ठेवण्यात आली आहेत.

सदर स्पर्धेकरिता प्रवेश विनामूल्य असून या स्पर्धेत जास्तीत जास्त धावपटूंनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. स्पर्धेसाठी नावनोंदणी करण्याकरिता ९४२०१९५५१८ आणि ९४२१२३८४८२ या क्रमांकांवर संपर्क साधावा किंवा जाहिरातीतील क्यूआर कोडद्वारे नोंदणी करावी.

आरोग्यदायी जीवनशैली, शिस्त, आत्मविश्वास आणि क्रीडाभावना यांचा संदेश देणारी ही मॅरेथॉन स्पर्धा सावंतवाडीकरांसाठी एक प्रेरणादायी क्रीडापर्व ठरणार असून, शहीद जवानांना धावण्याच्या माध्यमातून मानवंदना देण्याची ही एक अनोखी संधी आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles