सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या संघटनात्मक बांधणीला नवी दिशा देत पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार जाहीर झालेल्या या नियुक्त्यांमुळे सावंतवाडीतील शिवसेनेच्या संघटनात्मक कार्याला नवी ऊर्जा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
सावंतवाडी शहरप्रमुखपदी देवेंद्र पांडुरंग टेंबकर यांची, तर सावंतवाडी तालुका महिला उपजिल्हा संघटिकापदी सीमा मिलिंद मठकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या अधिकृत पत्रकाद्वारे या नियुक्त्यांची माहिती देण्यात आली आहे.
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात पक्षाची संघटनात्मक ताकद अधिक भक्कम करणे, जनसामान्यांशी संपर्क वाढविणे आणि पक्षाच्या विचारधारेचा प्रसार करणे, या दृष्टीने नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या महत्त्वपूर्ण मानल्या जात आहेत.
नव्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सावंतवाडीतील शिवसेनेच्या संघटनात्मक कार्याला अधिक गतिमानता मिळणार असून, पक्षाच्या आगामी वाटचालीत या नियुक्त्या महत्त्वाची भूमिका बजावतील, अशी अपेक्षा शिवसैनिकांकडून व्यक्त होत आहे.



