कुठ्ठाळी (गोवा) : भारतीय संविधान हे केवळ देशाच्या शासनव्यवस्थेचा आधारस्तंभ नसून, प्रत्येक भारतीय नागरिकाच्या स्वातंत्र्याचा, समानतेचा आणि न्यायाचा बुलंद आवाज आहे. २६ नोव्हेंबर हा संविधान दिन आणि २६ जानेवारी हा प्रजासत्ताक दिन भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचे दिवस आहेत. संविधानाने प्रत्येक नागरिकाला समान अधिकार बहाल केले असून, या अमूल्य लोकशाही वारशाचे महत्त्व नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे आणि संविधानिक मूल्यांविषयी जनजागृती करणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन अधिवक्ता परिषद गोवा, मुरगाव विभागाचे अध्यक्ष ॲड. दिलेश्वर नाईक यांनी केले.

अधिवक्ता परिषद गोवा, मुरगाव विभाग आणि दिप विहार उच्च माध्यमिक विद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संयुक्त विद्यमाने भारतीय संविधान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. गुरुवारी हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
यावेळी व्यासपीठावर ॲड. दिलेश्वर नाईक, ॲड. ज्ञानेश कर्पे, ॲड. खुशबू यादव, ॲड. रशिदा मालदार, ॲड. नियोज देसाई, ॲड. अंगरती नाईक आणि विद्यालयाच्या प्राचार्या मारिया गुदिन्हो डायस उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात संविधानाच्या पवित्र मूल्यांना उजाळा देणाऱ्या प्रतिज्ञेने झाली. ॲड. अंगरती नाईक यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना संविधान दिनानिमित्त प्रतिज्ञा दिली. संविधानातील न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांचे स्मरण करून देत विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम आणि संविधानाविषयी आदरभाव जागविण्याचा प्रयत्न करण्यात आला.
यावेळी विद्यार्थिनी मिनाक्षी, अश्परीया, पूर्वा, अनुष्का, अनामिका आणि अंजना यांनी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा. सुनील शेट यांनी स्वागत व प्रास्ताविक करत कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. कार्यक्रमाच्या शेवटी त्यांनी उपस्थितांचे आभार मानले.
या कार्यक्रमाला प्रा. स्वप्नेशा सतरकर, प्रा. सिद्धी धारगळकर, प्रा. सुदेश गांवकर, निर्मला नाईक आणि आदर्श नाईक यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी आणि मान्यवर उपस्थित होते.
संविधान दिनाच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमातून भारतीय संविधानाचे महत्त्व, नागरिकांचे अधिकार आणि लोकशाही मूल्यांची जपणूक यांचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला. संविधानाचा सन्मान, त्यातील मूल्यांचे आचरण आणि राष्ट्राच्या एकात्मतेची जपणूक करण्याचा संकल्प या कार्यक्रमातून अधोरेखित झाला.



