सावंतवाडी : वेंगुर्ला महाराष्ट्रातील अमृतनाथ सिद्धेश्वर दशावतार नाट्य मंडळाचे निर्माते श्री झिलू गोसावी यांचा गोव्यातील सुप्रसिद्ध ब्रम्हा करमळी सत्तरी या गावांमध्ये गोव्यातील नामवंत शिवव्याख्याते आणि सामाजिक कार्यकर्ते ॲड. शिवाजी देसाई यांच्या हस्ते ब्रह्मा करमळी सत्तरी गोवा येथील श्री शांतादुर्गा देवस्थानाच्या वर्धापन दिन कार्यक्रमात सन्मान करण्यात आला. आजपर्यंत श्री झिलू गोसावी यांनी २५० दशावतारी नाटकांची निर्मिती केल्याच्या निमित्ताने गौरव करण्यात आला.
याप्रसंगी बोलताना ॲड. शिवाजी देसाई म्हणाले की दशावतार” म्हणजे भगवान विष्णूचे दहा अवतार. दशावतारी नाट्यकलेच्या माध्यमातून भगवान विष्णूच्या विविध दहा अवतारातून निर्माण झालेल्या घटनांचे अध्यात्मिक प्रगटीकरण आणि प्रबोधन होत असते. दशावतारी नाट्य ही कोकण महाराष्ट्र आणि गोव्यातील परंपरा उज्वल हिंदू संस्कृती दर्शविते. या दशावतारी नाट्यकलेतून अध्यात्मिक उन्नती साधायला हवी आज दशावतारी नाट्य परंपरा टिकणे गरजेचे आहे. अनेक दशावतारी नाट्य कलाकार तूट पुंजा मानधनावर ही नाट्यकला जोपासत आले आहेत. आज या नाट्य कलेला संपूर्ण कोकणपट्टीमध्ये राज मान्यता मिळणे खूप आवश्यक आहे. गोवा महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यात दशावतारी नाटक मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे. तसेच राज्य पातळीवर ही कला कलाकाराना सादर करण्यासाठी सरकारने अनुदान आणि प्रोत्साहन दिले पाहिजे. दशावतारी नाट्य कलेमुळे अध्यात्मिक जागरण होत असते. या नाट्यकलेच्या कलाकारांना नेहमी सन्मानाने आपण पाहिले पाहिजे. ही कला खूप कठीण आहे असे ॲड. शिवाजी देसाई शेवटी म्हणाले.
यावेळी गौरवाला उत्तर देताना झिलू गोसावी म्हणाले की, दशावतारी नाट्य कलाकारांचा गौरव क्वचितच होत असतो. या नाट्यकलेकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा. ही कला मोठी व्हायला पाहिजे. आज झालेल्या गौरवाने आपले मन खूप भारावले आहे. येणाऱ्या काळात गोव्यामध्ये मोठ्या प्रमाणात दशावतारी नाट्य प्रयोग करण्याचा मनोदय आहे. शाल श्रीफळ आणि मानचिन्ह देऊन अँड शिवाजी देसाई यांच्या हस्ते दशावतारी नाट्यनिर्माते झिलू गोसावी यांचा गौरव करण्यात आला. यावेळी जयसिंग देसाई, रामराव देसाई, अरविंद देसाई यांची उपस्थिती होती. याप्रसंगी अमृतनाथ सिद्धेश्वर दशावतार नाट्य मंडळ म्हापण वेंगुर्ले च्या तर्फे दशावतारी नाट्य प्रयोग ,”कली आणि मच्छिंद्रनाथचे युद्ध” सादर करण्यात आला. या नाट्य प्रयोगामध्ये महेश गोसावी, संजय गोसावी, मिलींद नाईक, विनोद राणे, महादेव नाईक, प्रसाद (बाबू) जबडे, पांडुरंग पालकर सचिन कुंभार, बबलू पालकर, ओंकार गोसावी, दिनेश मांजरेकर, बालकलाकार मिहीर गोसावी,विनोद राणे ,झिलू गोसावी महेश गोसावी आधुनिक भाग घेतला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन जयसिंग देसाई यांनी केले. कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.