कोल्हापूर : ‘लिव्ह इन’मध्ये राहणारी समीक्षा उर्फ सानिका भरत नरसिंगे (वय २३, सध्या रा. सरनोबतवाडी, मूळ रा. जय भवानी कॉलनी, कसबा बावडा कोल्हापूर) हिने लग्नास नकार दिल्याच्या रागातून प्रियकराने तिचा चाकूने भोसकून खून केला.
ही घटना मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास सरनोबतवाडी येथील अमृतनगर परिसरात राहत्या घरी घडली. हल्लेखोर सतीश मारुती यादव (सध्या – रा. शिवाजी पेठ, मूळ पेंद्रेवाडी उंड्री, ता. पन्हाळा) हा पसार झाला असून, त्याच्यावर गांधीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. घटनास्थळ आणि सीपीआर पोलीस चौकीतून मिळालेल्या माहितीनुसार, समीक्षा नरसिंगे ही आयशू राजेंद्र अंपले (२५, सध्या रा. सरनोबतवाडी, मूळ रा. तेलंगणा) या मैत्रिणीसह सरनोबतवाडी येथील भाड्याच्या घरात राहत होती. दोघी मिळून इव्हेंट मॅनेजमेंटचे काम करीत होत्या. समीक्षा ही गेल्या सहा महिन्यांपासून सतीश यादव याच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहत होती. सतीश तिला लग्न करण्याचा आग्रह करीत होता. पण, चार वर्षांपूर्वी समीक्षाचे लग्न झाले होते. कौटुंबिक वादामुळे ती पतीसोबत राहत नव्हती. हा वाद न्यायप्रविष्ट असल्याने तिने लग्नास नकार दिला होता. यावरून दोघांमध्ये वादाचे खटके उडत होते. याच वादातून त्याने समीक्षास सरनोबतवाडी येथील भाड्याचे घर रिकामे करण्यास सांगितले होते.
चार दिवसांपासून कसबा बावडा येथे आईकडे राहणारी समीक्षा आणि तिची मैत्रीण आयशू या दोघी घरातील साहित्य आणण्यासाठी दुचाकीवरून सरनोबतवाडी येथे गेल्या होत्या. साहित्याची आवराआवर करताना तिने सतीशला फोन केला. सुमारे १५ मिनिटांत पोहोचलेल्या सतीशने लग्नाचा आग्रह धरत समीक्षासोबत वाद घातला. मैत्रिणीने वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. वाद विकोपाला जाताच सतीशने समीक्षाला चाकूने भोसकले. छातीत खोलवर जखम होताच समीक्षा चाकूसह कोसळली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या समीक्षाला लाथा मारून सतीश हॉलचे दार बाहेरून बंद करून निघून गेला. आयशू अंपले हिने अभिषेक सोनवणे या आपल्या मित्राला फोन करून बोलवून घेतले. त्यानंतर दोघांनी गंभीर जखमी अवस्थेतील समीक्षाला खासगी रुग्णालयात दाखल केले. पुढे सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.
कुटुंबाला धक्का –
सात वर्षांपूर्वी समीक्षाच्या वडिलांचे निधन झाले. तिची आई मासे विक्री करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होती. अलीकडे समीक्षा इव्हेंट मॅनेजमेंटचे काम करून कुटुंबाला हातभार लावत होती. तिच्या खुनामुळे कुटुंबाचा आधार हरपला असून, आई आणि भावंडांना मोठा धक्का बसला आहे. पुढील तपास गांधीनगर पोलीस करीत आहेत.