आदरणीय साने गुरुजी,
बरे झाले गुरुजी तुम्ही वाचला नाहीत,
नाहीतर भित्रेपणाचा कलंक तुम्हाला सतत ऐकावा लागला असता.
बरे झाले गुरुजी तुम्ही वाचला नाहीत,
नाहीतर येरागबाळ्यांनी तुम्हाला जीवनाचं महत्व शिकवलं असतं.
बरे झाले गुरुजी तुम्ही वाचला नाहीत,
नाहीतर आत्ममग्न लोकांनीच तुम्हाला समाजभान शिकवल असतं.
बरे झाले गुरुजी तुम्ही वाचला नाहीत,
नाहीतर चोरट्यांनीच तुम्हाला कर्तव्याचा पाठ शिकवला असता.
बरे झाले गुरुजी तुम्ही वाचला नाहीत,
नाहीतरी तुम्हालाच तुमच्या निराशेसाठी दोषी धरलं असतं.
बरे झाले गुरुजी तुम्ही वाचला नाहीत,
नाहीतर जीवनाचं सौंदर्य एखाद्या चैनबाजानं दाखवणं नशीबात आलं असतं.
बरे झाले गुरुजी तुम्ही वाचला नाहीत,
नाहीतर करुणेला दुबळेपणा म्हटलेलं ऐकवं लागलं असतं.
बरे झाले गुरुजी तुम्ही वाचला नाहीत,
नाहीतर अॅडजस्टमेंट करणार्यांनीच तुम्हाला मूल्य शिकवली असती.
बरे झाले गुरुजी तुम्ही वाचला नाहीत,
नाहीतर तुम्हाला कौरवांनीच गीता शिकवली असती.
……….
डॉ. रुपेश पाटकर.
(पुण्यतिथीदिनी साने गुरुजींना विनम्र अभिवादन!)