Monday, June 16, 2025

Buy now

spot_img

कोमसाप सावंतवाडी तालुकाध्यक्ष पदी कवी दीपक पटेकर तर सचिव पदी राजू तावडे यांची बिनविरोध निवड.

सावंतवाडी : कोकण मराठी साहित्य परिषद शाखा सावंतवाडी कार्यकारिणीची वार्षिक सर्वसाधारण सभा जिमखाना हॉल, सावंतवाडी येथे दि. ११ जून २०२५ रोजी तालुकाध्यक्ष संतोष सावंत यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक निरीक्षक जिल्हाध्यक्ष मंगेश मसके यांच्या उपस्थितीत खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. या वार्षिक सर्वसाधारण सभेत सावंतवाडी तालुका कोमसापच्या नूतन कार्यकारणीची निवड करण्यात आली. अध्यक्षपदी कवी दीपक पटेकर तर सचिवपदी राजू तावडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच जिल्हा प्रतिनिधी म्हणून संतोष सावंत यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली.

सावंतवाडी येथे आज रोजी पार पडलेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत २०२५ ते २०२८ या तीन वर्षाच्या कालावधीसाठी नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यात सावंतवाडी येथील कवी दीपक पटेकर यांची कोमसाप सावंतवाडी तालुका अध्यक्षपदी तर सचिवपदी राजू तावडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी अभिमन्यू लोंढे, कोषाध्यक्षपदी डॉ. दीपक तुपकर तर सहसचिवपदी विनायक गांवस यांची निवड जाहीर करण्यात आली. ज्येष्ठ सदस्य ॲड.नकुल पार्सेकर, भरत गावडे, सौ. प्रज्ञा मातोंडकर, सौ.मंगल नाईक-जोशी, सौ.मेघना राऊळ, सौ.प्रतिभा चव्हाण, विठ्ठल कदम यांची कार्यकारिणी सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली. याप्रसंगी कोमसापचे जिल्हाध्यक्ष मंगेश मसके यांनी निवड झालेल्या सर्व कार्यकारिणीचे अभिनंदन केले. तसेच मनोगतात नूतन कार्यकारिणीनं साहित्य चळवळ जोमानं पुढे नेण्याचे आवाहन केले. सर्वांनी दिलेल्या जबाबदारीनं पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांना अभिप्रेत कार्य करावं असं आवाहन केलं. गेली तीन वर्षे श्री संतोष सावंत व कार्यकारिणीने उत्तमरित्या काम पाहिलं होतं. जिल्हा साहित्य संमेलनासह विविध साहित्यिक कार्यक्रम या तीन वर्षांत राबविले गेले. यासाठी मावळत्या कार्यकारिणीच्या अभिनंदनाचा ठराव त्यांनी मांडला.

सभेच्या सुरुवातीला पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील शहीद, ज्येष्ठ साहित्यिक तथा वैज्ञानिक जयंत नारळीकर तसेच कोमसाप परिवारातील सदस्यांचे निधन झालेल्या नातेवाईकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. प्रतिभा चव्हाण यांनी मागील वार्षिक सभेच्या इतिवृत्ताचे वाचन केले. डॉ. दीपक तुपकर यांनी नफा-तोटा अंदाजपत्रक सादर करत वार्षिक जमा-खर्च अहवाल सादर केला. श्री.सावंत यांनी आपल्या कार्यकाळात राबविण्यात आलेल्या उपक्रमांचा अहवाल सादर केला. यानंतर नुतन कार्यकारिणीची बिनविरोध निवड प्रक्रिया पार पडली. याप्रसंगी व्यासपीठावर कोमसाप जिल्हाध्यक्ष मंगेश मसके, केंद्रीय सदस्या सौ. उषा परब, तालुकाध्यक्ष संतोष सावंत, जिल्हा सचिव विठ्ठल कदम, खजिनदार भरत गावडे, माजी तालुकाध्यक्ष प्रा. सुभाष गोवेकर, सचिव प्रतिभा चव्हाण, खजिनदार डॉ. दीपक तुपकर आदी उपस्थित होते. ज्येष्ठ साहित्यिका सौ. उषा परब, प्रा.सुभाष गोवेकर, ॲड.नकुल पार्सेकर, प्रा. ॲड.गणपत शिरोडकर, विनायक गांवस यांनी मनोगत व्यक्त करत शुभेच्छा दिल्या.

नवनियुक्त जिल्हा प्रतिनिधी संतोष सावंत यांनी मनोगत व्यक्त करताना मावळत्या कार्यकारिणीचे अभिनंदन करून नूतन कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या. जिल्ह्यात तालुक्याचे प्रतिनीधीत्व करताना पदाला न्याय देईन असं मत व्यक्त केलं.
नवनिर्वाचित अध्यक्ष दीपक पटेकर म्हणाले, “सर्वांनी आपल्यावर विश्वास टाकून तालुका अध्यक्ष म्हणून जी संधी दिली याबद्दल मी सर्वांचे ऋण व्यक्त करतो. साहित्यिकांची भूमी असलेल्या या कोकणात साहित्यिक चळवळ कशी पुढे जाईल यावर माझा भर असेल. त्यासह नवं साहित्यिकांना व्यासपीठ देण्यावर आपण भर देणार आहे. कोमसापचं सुरू असलेलं कार्य अधिक जोमानं पुढे घेऊन जाण्यासह आदरणीय मधुभाईंना अपेक्षित कार्य शाखेच्या माध्यमातून होईल असा विश्वास व्यक्त केला. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जी. ए. बुवा, एस. एन. मुकन्नावर, ॲड. प्रा. गणपत शिरोडकर, अभिनेते अभय नेवगी, दिनानाथ नाईक, ॲड.नकुल पार्सेकर, प्रा. रूपेश पाटील, दत्ताराम सडेकर, वाय. पी. नाईक, मृणालिनी कशाळीकर, प्रज्ञा मातोंडकर, मेघना राऊळ, सुहासिनी सडेकर, मंगल नाईक जोशी, डॉ. सोनल लेले, किशोर वालावलकर, संजीव मोहीते, डॉ. गणेश मर्गज, एकनाथ कांबळे, रामदास पारकर, संतोष पवार, रितेश राऊळ आदी उपस्थित होते. आभार प्रतिभा चव्हाण यांनी मानले.

कवी दीपक पटेकर गेली काही वर्षे कोमसापच्या माध्यमातून जिल्ह्यातील साहित्य क्षेत्रात कवी म्हणून नावारूपास आले असून राज्यभरातील विविध ठिकाणी होत असलेल्या स्नेहसंमेलनात निमंत्रित कवी म्हणूनही ते सहभागी असतात. कविता, गझल, ललित लेख, कथा, सामाजिक लेख लेखन आदी विषयांमध्ये त्यांनी विपुल लेखन केले असून लवकरच त्यांचा वृत्तबद्ध कवितांचा काव्यसंग्रह प्रकाशित होणार आहे. राज्यातील साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच, लालित्य नक्षत्रवेल, मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान अशा अनेक मराठी साहित्य संस्थांवर ते कार्यरत आहेत. अलीकडेच त्यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठानचा सर्वोत्कृष्ट स्तंभलेखन पुरस्कार प्राप्त झाला आहे. साहित्य प्रेरणा कट्टा आजगाव संस्थेने त्यांचा “कवितेचा दीपक” हा कार्यक्रम घेऊन गौरव केला आहे. सामाजिक क्षेत्रात जिल्ह्याच्या वीज ग्राहक संघटनेच्या जिल्हा सचिव पदावर ते कार्यरत असून दत्तमंदिर व वासुदेवानंद सरस्वती मंदिर व्यवस्थापन समिती सदस्य, श्री. काडसिद्धेश्वर सेवा समिती कार्यकारिणीचे विश्वस्त अशा आध्यात्मिक क्षेत्रातही ते कार्यरत आहेत. संवाद मिडियाचे कार्यकारी संपादक म्हणून काम पाहत असून ५१ देशात कार्य करणाऱ्या व्हॉईस ऑफ मिडियाचे सिंधुदुर्ग जिल्हा प्रसिद्धी प्रमुख म्हणून देखील ते कार्यरत आहेत. त्यांच्या निवडीबद्दल सर्वच स्तरावरून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles