सावंतवाडी : तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा शेर्ले नं .१ येथे सन २०२५ – २६ चा शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून “१०० शाळा भेटी” उपक्रमांतर्गत सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील उपस्थित होते. त्यांच्यासह शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ. अस्मी पंतोजी, सरपंच सौ. प्रांजल जाधव, उपसरपंच वासुदेव नाईक, पोलीस पाटील विश्राम जाधव, ग्रामपंचायत सदस्य सौ. श्रावणी धुरी, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य सौ. शीतल धुरी, सौ. स्मिता महाजन, सौ. समीक्षा धुरी, सौ. स्मिता धुरी आणि मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते.
यावेळी प्रमुख पाहुणे तहसीलदार श्रीधर पाटील यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी आपली शैक्षणिक वाटचाल उलगडून सांगितली आणि जिल्हा परिषद शाळेत मुलांना शिकवण्याचे महत्त्व अनेक उदाहरणांसह स्पष्ट केले. नुकतेच आयपीएस झालेले श्री. धोणे यांचे उदाहरण देत, जि. प. शाळेतील शिक्षण किती महत्त्वाचे आहे, हे त्यांनी अधोरेखित केले. मुलांना वाचनाची गोडी लागावी यासाठी त्यांनी सावित्रीबाई फुले आणि शिवाजी महाराज यांच्यावरील पुस्तके वाटप केली. ही पुस्तके का दिली, यामागचे महत्त्वही त्यांनी पटवून दिले. तसेच, ५ सप्टेंबर रोजी या पुस्तकांवर आधारित निबंध स्पर्धा घेण्याचे आवाहनही त्यांनी केले. उपस्थित महिलांचा त्यांनी ‘सावित्रीच्या लेकी’ असा गौरवपूर्ण उल्लेख केला.
श्री. पाटील यांनी शाळेच्या विविध गरजा जाणून घेतल्या आणि त्या पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. त्यांनी शाळेच्या परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली आणि शाळेत सुरू असलेल्या छप्पर दुरुस्तीच्या कामाची पाहणी करून काही महत्त्वाच्या सूचनाही दिल्या. त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात शाळेचे मुख्याध्यापक लक्ष्मीकांत कराड यांनी प्रास्ताविकाने केली. त्यानंतर सौ. श्रावणी धुरी यांनी पालकांनी मुलांच्या शाळेकडे अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचे नमूद केले. सरपंच सौ. प्रांजल जाधव आणि शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ. अस्मी पंतोजी यांनीही विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे निवेदन श्रीमती प्रिया सावंत यांनी केले. याप्रसंगी शाळेतील शिक्षिका श्रीमती सीमा जाधव, श्रीमती मेघना शेर्लेकर आणि शाळेचे उच्चश्रेणी मुख्याध्यापक श्री. लक्ष्मीकांत कराड उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली. दुपारच्या सत्रात मुलांना मध्यान्ह भोजनात गोड पदार्थ देण्यात आला, ज्यामुळे मुलांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला. हा प्रवेशोत्सव विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक प्रेरणादायी सोहळा ठरला.