मुंबई : मुंबईमध्ये 28 वर्षीय पोलीस कॉन्स्टेबल गौरी पाटील हिचा गुरुवारी, अंधेरी पश्चिम येथील एका रुग्णालयात भूल दिल्याने मृत्यू झाला. पाटील ही मुंबई पोलिसांच्या स्थानिक शस्त्र विभागात तैनात होती. ती कांदिवली पूर्व येथील रहिवासी होती. कानावर शस्त्रक्रिया करण्याआधी गरजेपेक्षा जास्त भूल (अॅनेस्थेशिया) दिली गेल्यामुळं हा अनर्थ घडल्याची चर्चा आहे. आंबोली पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
कानाच्या शस्त्रक्रियेसाठी गौरीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गौरीचा भाऊ विनायक पाटील यांनी सांगितले की, गौरीला उजव्या कानात समस्या होती, ती जेव्हाही काही थंड अन्न खात असे तेव्हा तिच्या कानात पाणी यायचे. म्हणून तिने ॲक्सिस हॉस्पिटलला भेट दिली. यावेळी 28 ऑगस्टला डॉक्टरांनी तिला दवाखान्यात दाखल केले आणि 30 ऑगस्टला शस्त्रक्रिया करण्याचे ठरविले.
मात्र, 29 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5 वाजता डॉक्टरांनी अचानक शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला आणि 15 ते 20 मिनिटांनी तिला ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आले. रात्री 8 च्या सुमारास कुटुंबियांना कळले की, तिचे शरीर प्रतिसाद देत नाही. तिचा रक्तदाब कमी झाला, पण तिचे हृदय धडधडत होते, म्हणून त्यांनी तिला आयसीयूमध्ये (इंटेसिव्ह केअर युनिट) हलवले. रात्री 9:50 वाजता, रुग्णालयाने सांगितले की तिचे निधन झाले आहे. शस्त्रक्रियेआधी त्यांना भूल देण्यात आली. त्यानंतर त्यांची प्रकृती खालावली, अशी माहिती गौरी पाटील यांचे बंधू विनायक पाटील यांनी दिली. तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जेजे रुग्णालयात नेण्यात आला.