सावंतवाडी : तालुक्यातील बांदा – मुस्लिमवाडी येथील रहिवासी आफताब कमरुद्दिन शेख (वय ३८) याने स्वतःचा व्हिडिओ बनवत आज पहाटे राहत्या घरी गळफास घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. उपचारादरम्यान सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातून गोवा – बांबोळी येथे नेत असतांना त्याचे निधन झाले, मात्र त्याने आत्महत्येपुर्वी बनवलेला व्हिडिओ नातेवाईकांच्या हाती लागला. त्यात काही जणांची नावे घेत ते आपल्या आत्महत्येस जबाबदार असल्याचा उल्लेख असल्याने नातेवाईक संप्तत झाले. जोपर्यंत त्या सर्वावर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका भाऊ अब्दुल रझाक शेख यांनी घेतली. त्यामुळे वातावरण अधिकच चिघळले. रात्री उशिरापर्यंत संबंधितावर गुन्हा दाखल न झाल्याने उपजिल्हा रुग्णालयामध्ये मुस्लिम समाज बांधवांनी मोठी गर्दी केली होती.



दरम्यान बांदा शहरात प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात आफताब शेख याचा फुल विक्रीचा व्यवसाय होता. आज पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास त्याने राहत्या घरात बेडरूममध्ये पंख्याला गळफास घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र बाजूच्याच रुममध्ये असलेल्या त्याच्या बायकोला संशय आल्याने तिने खिडकीतून पाहीले. नवरा आत्महत्या करत असल्याचे पाहताच तिने आरडाओरड करत घराच्या वरच्या मजल्यावर राहणाऱ्या दिर अब्दुल रझाक याला बोलावून आणले. त्याने खाली येत दरवाजा तोडला व आतमध्ये जात आफताबला गळफासावरुन खाली काढले. त्याला तात्काळ बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचाराकरिता हलविले. तेथे उपचार केल्यानंतर त्याला अधिक उपचाराकरिता सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात हलविले. तेथून अधिक उपचाराकरिता गोवा – बाबुंळी येथे हलवित असतांना त्याचे निधन झाले.

याच दरम्यान त्याने आत्महत्येच्या आधी केलेला व्हिडीओ नातेवाईकांच्या हाती लागला. त्यात त्याने पाच जणांची नावे घेत आपल्या आत्महत्येस ते लोकं कारणीभूत असल्याचे म्हटले आहे. यानंतर त्याठिकाणी असलेल्या आफताबचा भाऊ अब्दुल रझाक याच्यासह नातेवाईकांनी आत्महत्येस कारणीभूत असलेल्या पाचही जणावर जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका घेतली. ही बातमी सावंतवाडी तसेच बांदा येथील मुस्लिम बांधवांपर्यंत पोहोचतात उपजिल्हा रुग्णालयात मोठ्या संख्येने त्यांनी गर्दी केली. याबाबत पोलिसांपर्यंत माहिती पोहोचतात पोलीस उपविभागीय अधिकारी विनोद कांबळे यांच्यासह बांदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे तसेच सावंतवाडी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद पाटील यांच्यासह टीमने रुग्णालयात धाव घेत नातेवाईकांचे म्हणणे जाणून घेतले.
यावेळी मयत आफताब याचा भाऊ अब्दुल रझाक याने माझ्या भावाला एप्रिल महिन्यापासून किरकोळ गैरसमजातून फुल व्यवसाय करण्यासाठी काही जणांकडून त्रास दिला जात आहे. आमची तिसरी पिढी आज बांद्यामध्ये फुल व्यवसाय करत आहेत. परंतु काही जणांनी केलेल्या त्रासामुळे भावाचा व्यवसाय बंद राहिला आहे. ”तू दुकान सुरू केल्यास तुझ्यावर बंद दाखल करू!”, अशा प्रकारची धमकीही त्याला देण्यात येत होती. या संदर्भात त्याने बांदा पोलीस ठाणे तसेच जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडेही त्या संबधित व्यक्तिविरोधात लेखी तक्रारही केली होती. यावर उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडून तोडगा काढण्याचा प्रयत्नही झाला होता, परंतु त्यात यश आले नव्हते. व्यवसाय बंद असल्याने त्याची आर्थिक परिस्थिती कोलमडली होती. तो मानसिकरित्या पूर्णपणे खचला होता. त्या पाच जणांनी दिलेल्या त्रासातूनच त्यांनी आत्महत्या केली. त्यामुळे त्या सर्वांवर गुन्हे दाखल झालेच पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. त्याच्यासोबत उपजिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या मुस्लिम बांधवाकडूनही हिच मागणी लावून धरण्यात आली. यावेळी तौकीर शेख, ॲड. शमीउल्ला ख्वाॅजा, बांदा उपसरपंच जावेद खतिब, रफिक मेमन, आसिफ शेख, ॲड. संदीप निंबाळकर, वंचित बहुजन आघाडीचे महेश परुळेकर, मौसिम मुल्ला यांसह अनेक समाज बांधव उपस्थित होते.
अल्पसंख्यांक लोकांवर वेळोवेळी अन्याय केला जात असल्याचा आरोप यावेळी ॲड. निंबाळकर यांनी केला. राजकीय व्यक्तींच्या दबावाखाली पोलीस यंत्रणा राबत असून गुन्हे दाखल होत नाही, तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नसल्याचे त्यांनी सांगितले.


