सावंतवाडी: तालुक्यातील आजगाव गावातील श्री वेतोबा मंदिराजवळील असलेला बीएसएनएल मोबाईल टॉवर अचानक बंद पडल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत असून आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.गेल्या काही दिवसांपासून अचानक कॉल ड्रॉप, नेटवर्क गायब होणे, इंटरनेट वेग अत्यंत कमी अशा समस्या सातत्याने जाणवत असल्याची माहिती स्थानिकांकडून मिळत आहे.
याबाबत स्थानिकांनी सुद्धा संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून या समस्यांची माहिती दिली आहे.मात्र अजूनही याची दखल घेण्यात आली नसल्याने येथील ग्रामस्थात नाराजी पसरली आहे.
सध्या देश डिजिटल युगाच्या दिशेने जात असताना मात्र, गावा गावात उभारण्यात आलेले बीएसएनएल सेवा मात्र कोलमडलेलीच दिसत आहे.
बीएसएनएलकडून 5G सेवेकडे वाटचाल सुरू असल्याचे सांगितले जात असतानाच, मूलभूत 2G नेटवर्कही नीट उपलब्ध न राहणे हे ग्राहकांसाठी चिंतेचे कारण ठरत आहे.सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा म्हणून ओळखला जात असताना येथील महत्त्वाच्या श्रद्धास्थानाच्या परिसरातही नेटवर्क नसल्याने पर्यटक आणि ग्रामस्थ दोघेही अडचणीत आले आहेत.
स्थानिक नागरिकांनी कंपनीने टॉवरकडे सातत्याने होत असलेल्या दुर्लक्षावर नाराजी व्यक्त केली असून, तातडीने नेटवर्क सुरळीत करून सेवा पूर्ववत करण्याची मागणी बीएसएनएल प्रशासनाकडे केली आहे.


