सावंतवाडी : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग,राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था,सांगली आयोजित, शिक्षक व अधिकारी यांच्यासाठी राज्यस्तरीय तालवाद्य वादन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
केंद्र, तालुका, जिल्हा, विभाग असे सर्व टप्पे पार करत या स्पर्धेत राज्यस्तरावर कोल्हापूर विभागाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी सावंतवाडी येथील मिलाग्रीस हायस्कूलचे शिक्षक अमोल राऊळ यांना मिळाली. या स्पर्धेत त्यांनी राज्यस्तरावर तृतीय क्रमांक मिळवून उत्तुंग यश संपादन केले. या स्पर्धेत महाराष्ट्रातील आठ विभागातून ३५ स्पर्धक सहभागी झाले होते.
श्री. अमोल राऊळ हे मिलाग्रीस प्रशालेत संगीत शिक्षक म्हणून गेली पंधरा वर्षे कार्यरत असून ते तबला विशारद आहेत. संगीत क्षेत्रातील अनेक दिग्गजांना त्यांनी यापूर्वी तबलासाथ केलेली आहे. शिक्षक व अधिकारी यांच्यासाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत आयोजित या स्पर्धेत मिळालेले हे यश मिलाग्रीस प्रशालेसाठी अभिमानास्पद व अतुलनीय आहे. मिलाग्रीस प्रशालेचेच संगीत शिक्षक स्वप्निल गोरे यांनी त्यांना संगीत साथ केली. त्यांच्या या अभिमानास्पद कामगिरीसाठी प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदान्हा, पर्यवेक्षिका श्रीम. संध्या मुणगेकर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थी वर्ग यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.



