- ✍️ रूपेश पाटील.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील वेत्ये गावाचे आदर्श युवा सरपंच गुणाजी गावडे हे केवळ एका पदावर कार्यरत असलेले व्यक्तिमत्व नाही, तर ते गावाच्या सर्वांगीण प्रगतीचे चालते-बोलते प्रतीक आहेत. प्रशासन, समाज आणि माणुसकी यांचा समतोल साधत नेतृत्व कसे करावे याचा वस्तुपाठ त्यांनी आपल्या कार्यातून दिला आहे. गावातील प्रत्येक सुख-दुःखात स्वतःला सहभागी मानणारा, हक्काने जवळचा वाटणारा मित्र म्हणून त्यांची ओळख आहे. कोणाच्याही चेहऱ्यावरची चिंता असो किंवा आनंदाचा क्षण — गुणाजी गावडे हे त्या क्षणाचा भाग असतात. त्यामुळेच ते केवळ सरपंच नसून लोकांच्या मनातील माणूस आहेत.


सामाजिक, शैक्षणिक, अध्यात्मिक, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात त्यांनी राबविलेले उपक्रम हे त्यांच्या दूरदृष्टीचे आणि कार्यक्षमतेचे दर्शन घडवतात. युवकांना दिशा देणारे नेतृत्व, विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारा मार्गदर्शक आणि समाजाला एकत्र बांधणारा केंद्रबिंदू म्हणून त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे.


मुख्यमंत्री समृद्ध ग्राम अभियान अंतर्गत वेत्ये गावाला जिल्हास्तरावर नावलौकिक मिळवून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. शासनाच्या विविध योजना केवळ कागदावर न ठेवता त्या थेट तळागाळातील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी त्यांनी अत्यंत सजगतेने पार पाडली. प्रशासन आणि नागरिक यांच्यातील दुवा म्हणून त्यांनी काम करताना पारदर्शकता आणि विश्वास या मूल्यांना अग्रक्रम दिला.
एक यशस्वी उद्योजक म्हणून त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली असली, तरी त्या यशाचा उपयोग समाजासाठी कसा करायचा याचे भान त्यांनी कायम ठेवले. मैत्रीच्या दुनियेतील ‘राजा माणूस’ ही उपाधी त्यांच्या दिलदार स्वभावामुळेच मिळाली आहे. दिलेला शब्द पाळणे, वेळप्रसंगी हक्काने धावून येणे आणि मदतीसाठी कधीही मागे न हटणे हे त्यांचे वैशिष्ट्य आहे.


गावातील प्रत्येक उपक्रमात गुणाजी गावडे यांचा सर्व प्रकारचा सहभाग असतो. अनेकदा स्वतःच्या खिशाला झळ पोचली तरी चालेल पण घेतलेला उपक्रम पूर्ण करायचा ही त्यांची ख्याती आहे. गावाची जत्रा असो किंवा कोणताही उत्सव गुणाजी गावडे या सर्व उपक्रमात अग्रेसर असतात हे त्यांचे कार्यक्षमतेचे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहे. युवकांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन असो किंवा कोणत्याही खेळाची स्पर्धा यात सर्वात पुढाकाराची भूमिका घेतात ते स्वतः गुणाजी गावडे. केवळ गावालाच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याला आणि तळ कोकणातील प्रत्येकाला अभिमान वाटेल असा आदर्श युवा सरपंच गुणाजी गावडे लाखात येत आहेत.
कायम हसतमुख, जिंदादिल आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेले व्यक्तिमत्व म्हणून गुणाजी गावडे आज अनेकांसाठी आदर्श ठरले आहेत. आजपर्यंत त्यांच्या माध्यमातून राबविलेले अनेक सामाजिक विधायक उपक्रम हे त्यांच्या कार्याची साक्ष देतात.
आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त, वेत्ये गावाचा हा आदर्श सरपंच, संवेदनशील नेतृत्व आणि विश्वासाचा आधारस्तंभ यांना हृदयपूर्वक लाख लाख शुभेच्छा. त्यांच्या कार्याचा प्रवास असाच अखंड सुरू राहो आणि वेत्ये गावाची प्रगती त्यांच्या नेतृत्वाखाली नवे शिखर गाठो, हीच सदिच्छा.!

आमच्या सत्यार्थ महाराष्ट्र न्यूज परिवाराकडून गुणाजी गावडे यांना वाढदिवसानिमित्त हृदयपूर्वक शुभेच्छा…!



