✍️ रूपेश पाटील.
सावंतवाडी : रविवार दिनांक १ फेब्रुवारीला कोकणच्या राजकारणात नव्या पर्वाची नांदी झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे की “राणे हेच ब्रँड आहेत आणि तो ब्रँड अजूनही निर्विवाद आहे!” माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री तथा विद्यमान खासदार नारायण राणे, राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे, आणि कुडाळ–मालवणचे कार्यसम्राट आमदार निलेश राणे या ‘त्रिसूत्री’ नेतृत्वाने उभा केलेला प्रत्येक कार्यकर्ता, प्रत्येक पदाधिकारी आजही ‘राणे’ या एका छत्राखाली नतमस्तक आहे, हे वास्तव पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
‘राणे आणि सिंधुदुर्ग’ – एक अतूट अन् भावनिक नातं!
सिंधुदुर्गचा इतिहास साक्षी आहे, ज्यांनी ज्यांनी राणे ब्रँड सोडला, त्यांनी राजकीय, सामाजिक किंवा सार्वजनिक जीवनात उतरणीचा आलेख पाहिला आहे. हा केवळ योगायोग नाही, तर राजकीय वास्तव आहे.

सतीश सावंत : सहकार क्षेत्रातील दिग्गज ‘हिरा’.
सहकार क्षेत्रातील एक प्रभावी, अभ्यासू आणि अनुभवी नेतृत्व म्हणजे सतीश सावंत.
राणे कुटुंबासोबत असताना त्यांनी अनेक प्रतिष्ठेची पदे भूषवली. मात्र, काही राजकीय मतभेदांमुळे त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची वाट धरली आणि तेव्हापासून त्यांच्या कार्याची धार हळूहळू बोथट होत गेली.
तरीही, मनभेद असले तरी मनभंग कधीच झाला नाही.
ही दरी भरून काढण्याचे काम केले ते पालकमंत्री नितेश राणे यांनी!
राजकीय समन्वय, संयम आणि नेतृत्वगुणांचा उत्कृष्ट नमुना दाखवत नितेश राणे यांनी सतीश सावंत यांची भव्य घरवापसी घडवून आणली.
‘मशाल’ सोडून ‘कमळ’ हाती –
उबाठा सेनेचे कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांनी हरकुळ बु. विभागातील शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह रविवारी भाजपात जाहीर प्रवेश केला. पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत पार पडलेला हा पक्षप्रवेश सोहळा म्हणजे राजकीय शक्तिप्रदर्शनच होते. या प्रवेशासह सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात एक जुना अध्याय संपला आणि एक नवा, निर्णायक अध्याय सुरू झाला!

जेव्हापासून सतीश सावंत यांनी नाराज होऊन राणे यांना सोडून उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची वाट धरली तेव्हापासून सतीश सावंत यांच्या कार्याचा आलेख उतरता होत गेला. असे असतानाही सतीश सावंत आणि राणे परिवार मात्र मनापासून कधीही एकमेकांपासून दूर गेला नाही मनात कुठेतरी नाराजी होती ती नाराजी दूर करण्यात पालकमंत्री नितेश राणे यांना कमालीचे यश आले आहे. म्हणून उबाठा सेनेचे कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांचा हरकूळ बु.! विभागातील शेकडो प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यां सह रविवारी भाजपात पक्ष प्रवेश केला. पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत हा भव्य पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला. या निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणातील एक मोठे प्रस्थ आणि जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांनी ‘मशाल’ सोडून ‘कमळ’ हाती घेतले आहे. आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या कर्तबगारिने सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या एका नवीन राजकीय अध्यायाला सुरुवात झाली आहे.
सद्या सुरू असलेल्या जिल्हा परिषद निवडणुकांच्या तोंडावर ठाकरे शिवसेनेसाठी सतीश सावंत यांच्या रूपाने हा मोठा धक्का असून जिल्ह्याच्या राजकीय समीकरणांत मोठी उलथापालथ झाली आहे.
यावेळी भाजपात प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांमध्ये हरकुळ खुर्द सोसायटी व्हाइस चेअरमन नित्यानंद चिंदरकर, ग्रामपंचायत सदस्य मंजुषा पारकर,अर्चना घाडीगावकर,सोसायटी संचालक हनुमंत घाडीगावकर,ग्रामपंचायत सदस्य अंकिता सावंत, माजी सरपंच संदीप रासम, राजेंद्र ढवण, नागवे माजी सरपंच बाळा सावंत, चंद्रकांत सावंत, अजय सावंत यांच्यासह हरकुळ बुद्रुक जिल्हा परिषद मतदार संघातील १५० प्रमुख कार्यकर्त्यांसह हजारो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टी प्रवेश केला आहे.
श्री. सावंत यांच्यासोबत माजी पंचायत समिती सदस्य मंगेश सावंत, विविध गांवांचे सरपंच आणि असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपचा झेंडा खांद्यावर घेतला. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष असलेले सतीश सावंत हे एकेकाळी राणे कुटुंबाचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जात होते. मात्र, मधल्या काळात राजकीय मतभेदांमुळे त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला होता. आता पुन्हा एकदा मंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये परतल्याने “घरवापसी झाली आहे.” अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. यामुळे कणकवली मतदारसंघात भाजपची ताकद प्रचंड वाढली आहे.
‘ठाकरे’ शिवसेना नेस्तनाबूत!
सतीश सावंत हे ठाकरे शिवसेनेचे कणकवली विधानसभा अध्यक्ष होते. जिल्हा परिषद निवडणुकांच्या तोंडावर सतीश सावंत यांचा भाजपात प्रवेश म्हणजे ठाकरे गटासाठी मोठा राजकीय हादरा आहे. हरकुळ खुर्द सोसायटी व्हाइस चेअरमन नित्यानंद चिंदरकर, ग्रामपंचायत सदस्य मंजुषा पारकर, अर्चना घाडीगावकर, अंकिता सावंत, माजी सरपंच संदीप रासम, नागवेचे माजी सरपंच बाळा सावंत, चंद्रकांत सावंत, अजय सावंत हरकुळ बु. सरपंच आनंद ठाकूर,
भिरवंडे सरपंच नितीन सावंत, बेनी डिसोझा, मंगेश सावंत यांसारख्या महत्त्वाच्या मोहऱ्यांनी पक्ष सोडल्याने ठाकरे गटाची स्थानिक फळी पूर्णतः खिळखिळी झाली आहे.
- सहकार क्षेत्रात भाजपचे वर्चस्व अधिक घट्ट –
जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष म्हणून सतीश सावंत यांचा सहकार क्षेत्रावर मोठा प्रभाव आहे.
त्यांच्या भाजप प्रवेशामुळे जिल्हा बँक, विकास सोसायट्या, ग्रामीण अर्थकारण यावर भाजपचे वर्चस्व अधिक भक्कम होणार आहे. सतीश सावंत यांचा प्रवेश म्हणजे केवळ पक्षप्रवेश नाही, हा नितेश राणे यांच्या नेतृत्वाचा विजय आहे. हा राणे ब्रँडच्या ताकदीचा पुनर्जन्म आहे आणि हा सिंधुदुर्गच्या राजकारणातील निर्णायक टर्निंग पॉइंट आहे! आज पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे की, ‘राणे आहेत… म्हणून कोकण आहे!’ आणि भाजपची वाटचाल आता थांबवणे अशक्य आहे!



