: जी कविता अंतर्मनातून येते तीच कविता व्यक्तीला अंतर्मुख करते. स्वतला वजा करून कविता करतो तो कवी असतो. ज्यांचा ’नवोदित’ असा उल्लेख केला जातो, त्यांच्या कविता ऐकल्यावर ’नवोदित’ शब्द खोडूनच टाकावा, असे वाटते. कविता वास्तवाशी धरून असावी. म्हणजे ती जगण्याशी निगडीत होते. कवितेला शीर्षक असावे, साहित्यिक उषा परब यांनी 19 वर्षापूर्वी काढलेल्या टिंबाची आज ठळक रेषा झालेली आहे. अशाच कविता लिहीत रहा, असे प्रतिपादन
ज्येष्ठ कवयित्री-गीतकार पल्लवी बनसोडे यांनी केले. सावंतवाडी येथील चिंतामणी साहित्य सहयोग सहकारी प्रकाशन संस्था व आरती मासिकाच्या आयोजनाखाली कोमसाप सावंतवाडी व श्रीराम वाचन मंदिर यांच्या सहकार्याने 19 व्या निमंत्रितांचे विभागीय कवयित्री संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या.
त्या पुढे म्हणाल्या, सिंधुदुर्गाशी माझे जवळचे नाते आहे. इथे येताच ’इलास?’ या एका शब्दाच्या प्रश्नाने ही जवळीकता मला अधिक जाणवली. संमेलनासाठी उपस्थित पुरुषवर्गाची संख्या कौतुकास्पद आहे. संमेलनाच्या या व्यासपीठाविषयी आम्हालाही आकर्षण असते. ज्येष्ठ साहित्यिक उषा परब यांच्या अध्यक्षतेखालील संमेलन महिला समिती सदस्य श्रीया भागवत, मेघना राऊळ, स्मिता परब – खानोलकर, प्रज्ञा मातोंडकर, श्वेतल परब, प्रतिभा चव्हाण, ऋतुजा सावंत भोसले, विजया सावंत यांच्या आयोजनाचे कौतुक केले. निमंत्रित कवयित्रींनी सादर केलेल्या सर्वच कविता दर्जेदार झाल्याचे सांगत त्यांनी कवयित्रींचे कौतुक केले.
या काव्यमैफिलीत कवयित्रींनी काव्यरसिकांना वृत्तबद्ध, मुक्तछंद, लावणी, गझल अशा सर्व प्रकारच्या काव्यप्रांतात मनसोक्त विहार घडवून आणला. मधुरा माणगावकर यांनी ‘तू आहेस..घनघोर तमाच्या तळाशी…’ या कवितेतून ईश्वराच्या अस्तित्वावर शिक्कामोर्तब केले. चिन्मयी कुलकर्णी हिने ’हरवलेले बाबा’ कवितेतूत ‘एकदा गोंजारून म्हणाल का हो?
माझी लाडकी चिऊ.?’ अशी आर्त हाक देताच रसिकांचेही डोळे पाणावले.
विद्या मोरे सुर्यवंशी यांनी ‘वार झाले कैक नारी, तूच आता नार हो’ असा संदेश दिला. आर्या बागवे यांच्या ’रंगरंगोटी केलेले विदूषक पाहताना वाटते समाधान..’ या कवितेने कलाकाराचे आभासी व वास्तव जीवन यातील तफावत दर्शविली. श्रृती हजारे यांनी ‘आहे का उत्तर?’ या कवितेतून मनाला झालेल्या जखमांचे रिपोर्ट कार्ड कुठे मिळेल.? असे म्हणत मनातील भावनांच्या मोजमापाविषयी भाष्य केले. ‘चुकीच्या माणसाकडून चुकीच्या अपेक्षा करण्यात चुकतोच आपण..’ म्हणत नात्याच्या गोतावळ्यात माणूस कुठे चुकत असतो, हे सांगितले. अदिती मसुरकर यांनी वृत्तबद्ध फडाची लावणी ’जगते मंत्र पीरतीचा’ सादर केली. या लावणीस रसिकांनीही ठेका धरला.
‘दिसत राहिले कैक चेहरे, पडद्याआड लपलेले, कावळ्याने शिवलेले.. ’ म्हणत प्रा. मनिषा पाटील रसिकांना स्त्रीच्या भूतकाळातील जीवनात घेऊन गेल्या. बाईमनाची लक्ष्मणरेषा त्यांनी दाखविली. चित्रा गोस्वामी यांनी ’संघर्ष अजूनही चालूच आहे’ या काव्यातून स्त्रियांचे प्रश्न अधोरेखित केले.
त्याच वेळी ’पोलीस खात्यातील नोकरी.. पद, प्रतिष्ठा मिळते, पण करतो अन्याय तुझ्यावर.. ’म्हणत पोलिसाला कुटुंबास वेळ देता येत नसल्याची व्यथा मांडली.
पुजा दिवाण यांच्या कवितेने नात्यावर भाष्य करताना ’तोडलेले झाडसुद्धा फुलून येते.. तसे असावे नात्याने..’ म्हणत नाती का जपावीत, यावर भाष्य केले. ’कवित्व’ कवितेत ’शब्दांना आंजारून-गोंजारून बसवावं लागतं..’ म्हणत काव्य स्फुरल्यावर ते लिहावंच लागतं, हे विषद केले. प्रा. शालिनी मोहोळ यांनी ’आषाढीची वारी’ कवितेतून सर्वसामान्यास सतावणाऱ्या सद्यकालीन परिस्थितीबाबत विठ्ठल-रुक्मिणीस काय वाटते, यावर भाष्य केले.
मिनाक्षी अळवणी यांनी ‘मरण’ या भीषण वाटणाऱ्या सत्यावर व्यक्त होताना ’जीर्ण फाटक्या जगण्याचं सुमंगल करते मरण..’
अशी कविता शब्दबद्ध केली. सांगलीहून आलेल्या डॉ. लता ऐवळे कदम यांनी ’ठेव काळजात तुझ्या, मला थोडीतरी जागा.. ’ असं म्हणत ’धागा’ या कवितेतून बहीणभावाचे नाते उलगडले. ’फळ नसणाऱ्या झाडांनाही घालावं पाणी, किमान तिचा सन्मान म्हणून.. ’ असे म्हणत मूल नसणाऱ्या स्त्रीकडे सन्मानाने पहावे, असा संदेश दिला. ‘तुम्हाला मात्र देव हवाय, मायबापाचा ताप झालाय..’ अशा शब्दात
सारिका पाटील यांनी ‘मायबाप’ कवितेतून आई-वडिलांना सांभाळण्याचे आवाहन केले. काळा पैसा, कपट नीती यावर विडंबन करीत ‘मी आपलो साधो एक गोडो राक्षस आसय..’ असं म्हणत डॉ. सई लळीत यांनी ‘गोडो राक्षस’ कविता सादर करून मालवणी तडका दिला.
अनारोग्य, बेरोजगारी अशा अनेक समस्या असताना ’जगण्याचा अट्टाहास कशासाठी.?’ ही कविता तन्वी परब हिने सादर केली. डॉ. अंजली मुतालिक यांनी ‘शेतामध्ये बहरली पोपटी-हिरवी काजीराणी..’ अशा शब्दात कोकणातील फळफळावळ सादर केली. उद्घाटक कालिका बापट यांनी ‘हे मना, तू अनंत जन्मा सखा..’ हे काव्य सुरेल आवाजात सादर केले. ‘कोण कुठला कृष्ण, कुठली राधा, सांग ना मग काय नुरले आता.?’ ही कविता सादर केली. मृण्मयी पोकळे बांदेकर यांनी ‘नव्या युगाची झलक एआयने दाखविली..’ म्हणत खरे बाईपण निभावणे हे एआय गृहिणीच्या आवाक्यापलिकडे असल्याचे विषद केले. सरीता पवार यांनी मराठी-मालवणीचा सुरेख संगम साधत केलेल्या कवितेने ‘सावलीसारखं जगावं बाईमाणसानं ऐसपैस, अघळपघळ..’ म्हणत जुनी झाडे, तत्कालिन भुताटकीच्या संकल्पना आणि त्याकडे पाहण्याचा आईचा दृष्टीकोन विषद केला. मंगल नाईक-जोशी यांनी सर्वशक्तिमान शब्द प्रवाहाबरोबर चाललेत, याचा उद्वेग व्यक्त करणारी ‘चुकणाऱ्या समाजाला शब्दांशिवाय आहे तरी कोण?’ कविता सादर केली. स्वाती जोशी यांनी ‘या जगाच्या पलिकडे, कदाचित अजून एक अव्यक्त जीवन असेल,’ अशी आदर्शवत जगाची संकल्पना मांडली.
यावेळी सावंतवाडी ज्येष्ठ नागरिक संघाच्या सदस्यांचा प्रातिनिधीक सन्मान करण्यात आला. नगरसेवक अजय गोंदावळे यांनी या संमेलनासाठी आर्थिक सहकार्य दिल्याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले. कवयित्री संमेलनासाठी आरती मासिकाचे संपादक भरत गावडे, श्रीराम वाचन मंदिरचे कार्यवाह रमेश बोंद्रे, कोमसाप सावंतवाडीचे उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे, कोमसापचे सचिव संतोष सावंत, सुभाष गोवेकर, ज्येष्ठ कवयित्री कल्पना बांदेकर, रूपेश पाटील, मालवणी कवी दादा मडकईकर, डॉ. अमृता स्वार, सुहासिनी सडेकर, रामदास पारकर, श्री. भागवत, सावंतवाडी ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य, आदी मान्यवर उपस्थित होते. कवयित्री संमेलनाचे सूत्रसंचालन प्रज्ञा मातोंडकर यांनी केले. प्रा. श्वेतल परब यांनी आभार मानले.



