फोटो एक चर्चा अनेक! ; संदीप गावडे – प्रमोद गावडे गळाभेटीने वातावरणात गोडवा, सोबतीला अपक्ष अमेय पै यांचीही साथ.

​सावंतवाडी : तालुक्यातील निरवडे येथे आज अत्यंत लक्षवेधी राजकीय घडामोड पाहायला मिळाली. मतदान केंद्राच्या परिसरात महायुतीचे उमेदवार संदीप गावडे आणि अपक्ष उमेदवार अमेय पै यांची भेट झाली. मात्र, या संपूर्ण भेटीत अपक्ष उमेदवारापेक्षाही सावंतवाडी खरेदी-विक्री संघाचे चेअरमन प्रमोद गावडे यांची उपस्थिती आणि महायुतीच्या उमेदवारांनी घेतलेली गळाभेट सध्या संपूर्ण मतदारसंघात चर्चेचा आणि कुतूहलाचा विषय ठरलाय.

​ मतदानाच्या दिवशी प्रत्येक राजकीय पक्षाचे कार्यकर्ते मतदारांच्या मदतीसाठी केंद्राबाहेर आपले टेबल लावून बसलेले असतात. अशाच एका टेबलावर महायुतीचे उमेदवार संदीप गावडे आणि सावंतवाडीचे उपनगराध्यक्ष अनिल निरवडेकर यांनी भेट दिली असता त्या परिसरात प्रमोद गावडे यांची उपस्थिती होती. प्रमोद गावडे यांनी यापूर्वी जिल्हा परिषद निवडणुकीत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली होती आणि नंतर त्यांनी आपला अर्ज मागे घेतला होता. अशा अनुभवी आणि वजनदार नेत्याला ऐन मतदानाच्या दिवशी महायुतीच्या उमेदवारांनी दिलेली ही गळाभेट केवळ योगायोग आहे.​

यावेळी रिंगणातील अपक्ष उमेदवार अमेय पै देखील तिथे उपस्थित होते. परस्परांविरुद्ध राजकीय रणांगणात असलेल्या नेत्यांनी एकमेकांसमोर आल्यावर अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात संवाद साधला. ही राजकारणापलीकडची मैत्री असल्याचे दिसले. या अनपेक्षित भेटीमुळे उपस्थित कार्यकर्त्यांच्या आणि मतदारांच्या भुवया मात्र उंचावल्या असून, या गळाभेटीचा नेमका अर्थ काय?, यावर आता खमंग चर्चा रंगू लागली आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles