सावंतवाडी : नेमळे पोकळे नगर येथील नेमळे पंचक्रोशी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या लगत वेंगुर्ला – बेळगांव या राष्ट्रीय महामार्गांवरून सातत्याने सुसाट व भरधावं अवजड वाहतुकीमुळे विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. शाळा भरतेवेळी तसेच सुटते वेळी या महामार्गांवर मुलांची गर्दी असते. अशावेळी या महामार्गांवर दुचाकी, चार चाकी अवजड वाहने वाहन चालक मागे पुढे न बघता सुसाट भरधावं वेगाने चालवत असतात. अशावेळी या नेमळे हायस्कूल च्या गेटवर मुलांचे जीव घेणे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. संबंधित महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाकडे या वेंगुर्ला – बेळगाव महामार्गवरील नेमळे हायस्कूलसमोरील गती रोधकांसाठी नेमळे ग्रामपंचायत, नेमळे शिक्षण संस्थेकडून वारंवार तक्रारी व निवेदनाद्वारे मागणी करूनही याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.

परिणामी विद्यार्थ्यांचे भविष्य व सुरक्षितता धोक्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी लवकरात लवकर या नेमळे हायस्कूल समोरील महामार्गांवर दोन्ही बाजूने गतिरोधक घालावे. तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूना शालेय सूचना फलक लावावे. अशी मागणी पालक वर्गाकडून करण्यात आली आहे. शाळा भरते वेळी तसेच सुटते वेळी मुलांचे जीवघेणे अपघात झाल्यास संबंधित विभागावर गुन्हे दाखल करणार असल्याचा इशारा संतप्त पालक वर्गाकडून देण्यात आला आहे.



