‘तो’ प्रकार लोकशाहीसाठी अत्यंत घातक! : आ. दीपक केसरकर. ; सावंतवाडी येथे नवनिर्वाचितांचा स्नेहसत्कार!

सावंतवाडी : आजच्या काळात धनशक्तीच्या जोरावर निवडणूक लढवणे आणि निवडून येणे सोपे राहिलेलं नाही. सावंतवाडी मतदारसंघात अपक्ष उमेदवारांसाठी ज्या प्रकारे पैशांचा वणवा पेटवण्यात आला तो प्रकार लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे, अस मत माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केले. सावंतवाडी येथील नवनिर्वाचित जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांच्या सत्कार समारंभात श्री. केसरकर बोलत होते.

यावेळी आ. केसरकर यांनी निवडणुकीतील आर्थिक व्यवहारांवर कडक ताशेरे ओढले. ते म्हणाले, लोकशाहीत पैशांचा असा वारेमाप वापर होणे ही चिंतेची बाब आहे. हे प्रकार नेमके कोणी केले ? याची सखोल माहिती घेऊन आपण यासंदर्भात वरिष्ठांचे लक्ष वेधणार आहोत. या निवडणुकीत काही उमेदवारांचा थोडक्या मतांनी पराभव झाला. मात्र, त्यांनी खचून जाण्याचे कारण नाही. पराभूत उमेदवारांनी निराश न होता संघटनेसाठी अधिक जोमाने काम करत राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.
या सोहळ्यात न्हावेली पंचायत समिती गणाचे नवनिर्वाचित सदस्य शरद धाऊसकर यांच्यासह इतर विजयी उमेदवारांचा आमदार केसरकर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींना मार्गदर्शन करताना ते म्हणाले, जनतेने ज्या विश्वासाने तुम्हाला कौल दिला आहे. तो सार्थ ठरवण्यासाठी आतापासूनच कामाला लागा. लोकांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्यांची कामे मार्गी लावणे ही तुमची प्राथमिक जबाबदारी आहे. या विकासकामांसाठी आवश्यक असलेल्या निधीची कोणतीही कमतरता पडू दिली जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुतीला मिळालेले यश हे अत्यंत आनंददायी असल्याचे सांगत, आगामी काळात संघटन अधिक मजबूत करण्यावर आपला भर असेल असे त्यांनी स्पष्ट केले. येत्या महिनाभरात प्रत्येक गावात जाऊन नव्या युवा पिढीला संघटनेशी जोडणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. या सत्कार सोहळ्याला शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, सचिन वालावलकर, प्रेमानंद देसाई, गणेशप्रसाद गवस, राजू निंबाळकर यांसह शिवसेनेचे इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles