सावंतवाडी : येथे अखिल भारतीय मराठा महासंघ यांच्या वतीने गुरुवार दिनांक १९ फेब्रुवारी २०२६ रोजी शिवजन्मोत्सव सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम जनरल जगनाथराव भोसले शिवउद्यान येथे पार पडणार आहे. छत्रपतींच्या पराक्रमाची आणि स्वराज्य स्थापनेच्या प्रेरणेची आठवण करून देणाऱ्या या सोहळ्यात विविध मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.
सायंकाळी ५.०० वाजता उद्घाटन कार्यक्रम होणार असून उद्घाटक म्हणून नगरसेवक तथा माजी नगराध्यक्ष सच्चिदानंद उर्फ संजू परब उपस्थित राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून युवराज लखमराजे सावंतभोसले यांची उपस्थिती लाभणार आहे.
सायंकाळी ६.०० वाजता सावंतवाडी नगरपरिषद, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये निवडून आलेल्या नवनिर्वाचित मराठा सदस्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
त्यानंतर सायंकाळी ७.०० वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावर आधारित “शूर शिवराया” हा विशेष कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाद्वारे शिवचरित्रातील प्रेरणादायी प्रसंगांचे सादरीकरण करण्यात येईल.
या सोहळ्यास मराठा बांधवांसह सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. जिल्हाध्यक्ष अॅड. सुहास सावंत आणि तालुकाध्यक्ष अभिषेक सावंत यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्याची विनंती केली आहे.
सावंतवाडी शहरात शिवजन्मोत्सव निमित्त उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, हा सोहळा ऐतिहासिक आणि प्रेरणादायी ठरणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



