काजू बोर्डाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे आर्थिक सक्षमीकरण करणार! : मनीष दळवी.

सिंधुदुर्गनगरी: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काजू बागायतदार आणि उद्योजकांना भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी काजू बोर्डाची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. या बोर्डाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अधिकाधिक लाभ मिळवून देण्यासोबतच, आगामी काळात योग्य हमीभाव आणि त्यांच्या सर्व समस्यांचे निराकरण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असा ठाम विश्वास सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी व्यक्त केला.

​काजू हंगाम २०२६ च्या पार्श्वभूमीवर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने आयोजित विशेष समन्वय बैठकीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी उद्योजक आणि शेतकऱ्यांच्या विविध समस्या सविस्तरपणे ऐकून घेतल्या आणि त्यावर सकारात्मक चर्चा करून मार्ग काढण्याचे आश्वासन दिले. ही बैठक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तुळशीदास रावराणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
​याप्रसंगी मार्गदर्शन करताना सभापती तुळशीदास रावराणे म्हणाले की, बाजार समितीचे कायदे आणि नियम हे सर्वांच्या हितासाठी आहेत, त्यामुळे सर्वांनी त्याचे पालन करणे आवश्यक आहे. येत्या काजू हंगामात व्यवहारांमध्ये पूर्णपणे पारदर्शकता असावी, शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाचा योग्य दर मिळावा आणि बाजार समितीच्या नियमांचे काटेकोर पालन व्हावे, यासाठी सर्व घटकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
​बैठकीदरम्यान पणन मंडळाच्या अधिकाऱ्यांनी शासनाच्या विविध योजनांची सविस्तर माहिती दिली, ज्याचा उपयोग काजू उत्पादक आणि प्रक्रिया उद्योजकांना होऊ शकतो. जिल्हा उपनिबंधक बाळ परब यांनी कायदेशीर बाबींकडे लक्ष वेधत, सर्व व्यापारी व उद्योजकांनी आपला वैध परवाना घेणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट केले. यावर महाराष्ट्र काजू असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश बोवलेकर यांनी व्यापाऱ्यांच्या वतीने आपली भूमिका मांडली. त्यांनी आगामी हंगामात बाजार समितीला पूर्ण सहकार्य करण्याचे आणि नियमांचे पालन करण्याचे आश्वासन दिले.
​कार्यक्रमाच्या शेवटी बाजार समितीचे उपसभापती प्रसाद पाटकर यांनी उपस्थित सर्व व्यापारी, उद्योजक आणि शेतकरी बांधवांचे आभार मानले. २०२६ चा काजू हंगाम सुरळीत, पारदर्शक आणि यशस्वी करण्यासाठी सर्वांनी संघटितपणे कार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. या बैठकीस जिल्ह्याचे उपनिबंधक बाळ परब, पणन मंडळ अधिकारी, बाजार समितीचे संचालक मंडळ आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles