सिंधुदुर्गनगरी : येथे प्रजासत्ताक दिनापासून विविध मागण्यांसाठी उपोषण करत असलेले राज्य माहिती अधिकार पदाधिकारी तथा उपोषणकर्ते सुशील चौगुले यांच्यावर २२ फेब्रुवारी रोजी पहाटे उपोषण स्थळी येऊन धमकी तसेच त्यांचा तंबू मोडून पळ काढल्या प्रकरणी मडूरा येथील कृष्णा उर्फ बाळू गावडे यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी उपोषणकर्ते सुशील चौगुले यांनी पोलिसांकडे केली आहे.
आपल्या निवेदनात श्री. चौगुले म्हणतात – दिनांक १५ फेब्रुवारी २०२६ रोजी उपोषण स्थळी येऊन श्री रामा गंगाराम परब हा आमचे व्हिडिओ शूटिंग घेऊन गेला. तसेच त्याने रेकी केलेबाबत यापूर्वी आम्ही तक्रार पोलीस ठाणेकडे दिलेली आहे. मात्र पोलिसांकडून कोणतीही दखल घेतली गेली नाही.

परिणामी दिनांक २२ फेब्रुवारी रोजी पहाटे ०३.४५ वाजता आमच्या टेन्टमध्ये आम्ही झोपलेलो असताना अंधाराचा फायदा घेत गाव मौजे मडूरा येथील संशयित व्यक्ती कृष्णा उर्फ बाळू गावडे यांनी आमचा टेंट मोडून काढला. तसेच आम्हाला शिवीगाळ करून जिवे मारण्याच्या प्रयत्न केला. सदर टेन्टला लॉक सिस्टीम असल्याकारणाने तसेच सोबत कोणी होमगार्ड वगैरे किंवा पोलीस वगैरे नसल्यामुळे सदर इसम हा आम्ही बाहेर येईपर्यंत पळून जाण्यात यशस्वी ठरला. मात्र त्याचा आवाज तसेच चेहरा पट्टी माहीत असल्याने तसेच उपोषणास तोच कारणीभूत असल्याने उपरोक्त विषयी सदर घटनेस तोच जबाबदार असल्याने व माननीय उच्च न्यायालयात सदर व्यक्तीवर दावा दाखल होत असल्याने हे बेकायदेशीर कृत्य सदर इसमानेच केले असावे. तरी या गुन्हेगारी मानसिकतेच्या इसमावर तात्काळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करावा. तसेच उपोषण बंदोबस्त प्रकरणी आपले कर्तव्यात कसूर करणाऱ्या सर्वांवर तात्काळ योग्य ती कारवाई व कर्तव्यपालनातील कसुरी प्रकरणी निलंबनाची कारवाई करण्यात यावी, अशी विनंती निवेदनाद्वारे उपोषणकर्ते सुशील चौगुले यांनी केली आहे.



