मुंबई-गोवा महामार्गावर वेत्ये येथे भीषण अपघात! ; एर्टिगा कारची बोलेरो पिकअपला जोरदार धडक, वाहन पलटी! ; सरपंच गुणाजी गावडे व युवा शिलेदारांची तत्पर मदत.

सावंतवाडी : तालुक्यातील वेत्ये येथे आज सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात घडला. बोलेरो पिकअप व मारुती सुझुकी एर्टिगा कार यांच्यात झालेल्या जोरदार धडकेत बोलेरो वाहन रस्त्यावरच पलटी झाल्याची घटना घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वेत्ये परिसरात बोलेरो पिकअप रस्ता ओलांडत असताना मागून भरधाव वेगाने येणाऱ्या एर्टिगा कारने त्यास जबर धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी प्रचंड होती की बोलेरो वाहनाचा तोल जाऊन ते रस्त्यावरच उलटले. अपघाताचा आवाज मोठा असल्याने परिसरातील नागरिक घटनास्थळी धावून आले.


अपघातानंतर काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. वेत्येचे सरपंच गुणाजी गावडे यांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून जखमींची विचारपूस केली तसेच वाहतूक सुरळीत करण्यासाठी पुढाकार घेतला. त्यांच्या सोबत युवा शिलेदारांनीही मदतकार्य करत वाहनांमधील व्यक्तींना सुरक्षित बाहेर काढण्यास सहकार्य केले.
सुदैवाने दोन्ही वाहनांतील चालक व प्रवासी बचावले असून त्यांना कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही. प्राथमिक तपासानुसार अपघात वेगामुळे झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. पुढील तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू आहे.
या घटनेमुळे महामार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवून सावधगिरी बाळगण्याचे आवाहन स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles