तुळस येथे रक्तदान शिबीर उत्साहात संपन्न, तब्बल ५६ रक्तदात्यांचा सहभाग! ; वेताळ प्रतिष्ठानचे सलग ३५ वे शिबीर.

वेंगुर्ला : वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळस यांच्या पुढाकारातून कोकण कला व शिक्षण विकास संस्था सिंधुदुर्ग, तसेच लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप सोसायटी लि. यांच्या संयुक्त विद्यमाने तुळस येथे रक्तपेढी सिंधुदुर्ग यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिर उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.
समाजातील विविध स्तरांतील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत एकूण ५६ रक्तदात्यांनी सहभाग नोंदवत सामाजिक बांधिलकी जपली. विशेष म्हणजे, हे वेताळ प्रतिष्ठानचे सलग ३५ वे रक्तदान शिबिर ठरले असून संस्थेच्या सातत्यपूर्ण सामाजिक कार्याची ही आणखी एक उल्लेखनीय नोंद ठरली.
कार्यक्रमाचे उद्घाटन तुळस ग्रामपंचायतीच्या सरपंच रश्मी परब यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर जि. प. सदस्या सुजाता पडवळ, लोकमान्य बँक सिंधुदुर्ग जिल्हा सी एस आर प्रमुख गौरी जुवेकर, ग्रा. प. सदस्य जयवंत तुळसकर, लोकमान्य बँके वेंगुर्ले चे शाखाधिकारी चक्रपाणी गवंडी, कोकण कला व शिक्षण विकास संस्था प्रतिनिधी स्वाती मांजरेकर, रक्तपेढी वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिषेक पत्तेकर तसेच सामाजिक कार्यकर्ते नारायण नागवेकर ,मातोश्री चे जयंत मुळीक आदी मान्यवर उपस्थित होते. तुळस प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ. सानिया खान व डॉ. मिलिंद मोळके यांनीही शिबिरास सदिच्छा भेट देऊन आयोजकांचे कौतुक केले.


यावेळी बोलताना सरपंच रश्मी परब म्हणाल्या की, “रक्तदान हे श्रेष्ठ दान असून एका रक्तदात्यामुळे अनेकांचे प्राण वाचू शकतात. प्रत्येक सशक्त नागरिकाने नियमित रक्तदान करून समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे. अशा उपक्रमांमुळे मानवतेची भावना अधिक दृढ होते.” जि. प. सदस्या सुजाता पडवळ यांनीही प्रतिष्ठानच्या उपक्रमास शुभेच्छा देत त्यांच्या सातत्यपूर्ण सामाजिक कार्याचा गौरव केला.


याच कार्यक्रमात सामाजिक क्षेत्रात बहुआयामी व सातत्यपूर्ण कार्य केल्याबद्दल वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळसचे सचिव डॉ. सचिन परुळकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

कायाकल्प फाउंडेशन व लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप सोसायटी लि. यांच्या वतीने लोकमान्य बँक सिंधुदुर्ग जिल्हा सी एस आर प्रमुख गौरी जुवेकर यांच्या हस्ते डॉ. परुळकर यांना मानचिन्ह, प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. यावेळी शाखाधिकारी चक्रपाणी गवंडी यांनी डॉ. परुळकर यांच्या संघटन व नियोजन कौशल्याचे विशेष कौतुक करत समाजपयोगी व नाविन्यपूर्ण उपक्रम सातत्याने राबवत असल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.
सर्व रक्तदात्यांना कोकण कला व शिक्षण विकास संस्था यांच्या वतीने दयानंद कुबल यांच्या सहकार्याने रोप देऊन गौरविण्यात आले. शिबिर यशस्वी करण्यासाठी महेश राऊळ, सचिन गावडे, मंगेश सावंत, सदगुरू सावंत, सुहास सावंत, प्रदीप परुळकर, नाना राऊळ, सागर सावंत, वैष्णवी परुळकर, डॉ. जी. पी. धुरी, यशवंत राऊळ, समर्थ तुळसकर आदींनी विशेष परिश्रम घेतले. रक्तदात्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे व मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रम यशस्वी ठरला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सचिन परुळकर यांनी तर आभार माधव तुळसकर यांनी मानले. उपस्थितांनी आयोजकांचे अभिनंदन करत भविष्यातही अशा समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्याची अपेक्षा व्यक्त केली.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles