अमरावती : विधानसभा निवडणुकीची तयारी सर्वच पक्षांनी सुरू केली आहे. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी या दोन प्रमुख आघाडीमध्ये लढत असल्याचे सध्या दिसत असले तरी इतरही अनेक राजकीय पक्ष, डावे, वंचित आणि तिसरी आघाडी प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात दिसणार आहेत. यामध्ये आता महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाचाही समावेश होण्याची शक्यता आहे. मनासारख्या जागा मिळाल्या नाही तर महायुतीमधून बाहेर पडून संपूर्ण 288 जागांवर निवडणूक लढण्याचा इशारा रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी दिला आहे.
महायुतीमध्ये रासप, रिपाई असे विविध घटक पक्ष आहेत. या पक्षांचा एक मतदार वर्ग आहे. त्यामुळेच महायुती असेल किंवा महाविकास आघाडी यामध्ये या पक्षांनाही मानाचे स्थान आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीने आम्हाला 40 जागा दिल्या पाहिजे, अन्यथा आम्ही संपूर्ण 288 जागांवर उमेदवार उभे करू असा इशारा राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी अमरावती येथील पत्रकार परिषदेत बोलताना दिला आहे. पक्षाच्या मेळाव्यासाठी जानकर अमरावीत आले आहेत.
रासपची ताकद दाखवण्यासाठी आपल्याला 288 जागा लढवाव्या लागतील अशी भूमिका राज्य कार्यकारिणीने घेतली असल्याचे जानकरांनी सांगितले. ते म्हणाले की, भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी प्रत्येकी आम्हाला 12-12 जागा द्याव्या. सध्या आम्ही महायुतीत आहोत. मात्र, त्यांनी आम्हाला जागाच दिल्या नाहीत तर आम्हाला आमची तयारी करावी लागेल.
रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टीनेही महायुतीत 12 जागांची मागणी केली आहे. महायुतीतील प्रमुख तीन पक्षांनी प्रत्येकी चार-चार जागा देण्याची त्यांची मागणी आहे. भाजपचे राज्याचे प्रभारी भुपेंद्र यादव आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना भेटून रिपाईने त्यांना पत्र दिले आहे.