सावंतवाडी : तालुक्यातील ओवळीये येथे जमिनीच्या वादातून एका महिलेची कोयत्याने डोक्यात वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना आज सायंकाळी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास घडली.
मृत महिलेचे नाव सरस्वती धोंडी सावंत (वय ६५) असे असून, या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जमिनीच्या वादातून हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असून, एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. पंचनामा व इतर कायदेशीर प्रक्रिया सुरू असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.
दरम्यान, या घटनेमुळे ओवळीये परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.



