सावंतवाडी : येथील कै. डॉ. भाऊसाहेब परूळेकर नर्सिंग होम येथे आज मुंबईस्थित कै. दिनकर गंगाराम सामंत ट्रस्टतर्फे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बारा गरजू रुग्ण व होतकरू विद्यार्थ्यांना प्रत्येकी दहा हजार रुपयांचे धनादेश वितरित करण्यात आले. हे धनादेश डॉ. जयेंद्र परुळेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
या उपक्रमाअंतर्गत विविध आजारांनी ग्रस्त रुग्ण तसेच शिक्षणासाठी आर्थिक मदतीची गरज असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला. पेंडूर येथील इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील विद्यार्थी मोहन गावडे, तसेच कॉम्प्युटर इंजिनिअरिंग डिप्लोमा करणाऱ्या सिमरन चव्हाण, तनिषा नाईक आणि संजना सावंत या विद्यार्थिनींना मदत देण्यात आली.
तसेच पेंडूर येथील गॅंगरीनग्रस्त बाबना तांडेल, गर्भाशयाच्या गंभीर आजाराने त्रस्त विलासिनी गावडे, कोलगाव येथील विद्यार्थी प्रथमेश धुरी, मळगाव येथील पोटाच्या विकाराने ग्रस्त राकेश राणे, झाराप येथील स्वादुपिंडाच्या आजाराने ग्रस्त स्वानंदी गावकर, असनीये येथील उच्च रक्तदाबाने त्रस्त सुमित्रा असनीयेकर, किडनी विकारग्रस्त शंकर सावंत तसेच शेर्ले येथील दिव्यांग मुलाची आई प्रतीक्षा काळसेकर यांना आर्थिक सहाय्य देण्यात आले.
या मदतीमुळे गरजू कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला असून ट्रस्टच्या या सामाजिक उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.



