शिक्षणाच्या ताणातून १७ वर्षीय विद्यार्थ्याचे टोकाचे पाऊल. ; सावंतवाडीत हळहळ.

सावंतवाडी : शहरातील बिरोडकरटेंब परिसरात घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर सुन्न झाला आहे. अवघ्या १७ वर्षांच्या अल्पवयीन युवकाने शिक्षणाच्या ताणाला कंटाळून आयुष्य संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतल्याने त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मंगळवारी रात्री ही दुर्दैवी घटना घडली. घराच्या गॅलरीतून उडी घेतल्यानंतर तन्मय गंभीर जखमी झाला. त्याचा पाय फ्रॅक्चर झाल्याने वडिलांनी तातडीने सावंतवाडी पोलिसांशी संपर्क साधत त्याला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी गोवा येथील बांबोळी रुग्णालयात हलविण्यात आले. डॉक्टरांच्या सर्व प्रयत्नांनंतरही रात्री उशिरा त्याची प्राणज्योत मालवली.
या घटनेने अधिक वेदना वाढवणारी बाब म्हणजे सदर युवकाने  आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिट्ठी. “मला आता शिकायचे नाही… माझ्या मरणास कोणालाही जबाबदार धरू नये,” असे त्याने त्यात नमूद केले होते. या ओळी वाचताना प्रत्येकाचे हृदय पिळवटून निघत आहे.
हा युवक स्वभावाने शांत आणि निरागस होता, अशी माहिती परिसरातील नागरिकांनी दिली. त्याच्या अकाली जाण्याने कुटुंबियांसह मित्रपरिवारावर शोककळा पसरली असून सावंतवाडी शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
ही घटना पुन्हा एकदा विद्यार्थ्यांवरील वाढता ताण, अपेक्षांचे ओझे आणि मानसिक आरोग्याच्या प्रश्नांकडे गंभीरपणे पाहण्याची गरज अधोरेखित करून जाते. तरुणाईने अशा प्रसंगी एकटेपणा न मानता कुटुंबीय, मित्र किंवा शिक्षकांशी मन मोकळं करण्याची गरज असल्याचेही या घटनेतून अधोरेखित होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles