सावंतवाडी : तालुक्यातील आंबोली घाटात आज रविवारी सकाळी सुमारे १०.३० वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात ११ वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर तिच्या आई-वडिलांसह लहान बहिणीला किरकोळ दुखापत झाली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रसाद गोविंद राऊत हे आपल्या कुटुंबासह सुजुकी ॲक्सेस (क्र. MH 07 AU 6928) या दुचाकीवरून आंबोलीकडून दानोळीच्या दिशेने जात होते. नानापाणीच्या पुढील वळणावर आले असता त्यांच्या मागून येणाऱ्या आयशर ट्रकने (क्र. GJ 03 BW 9027) दुचाकीला जोरदार धडक दिली.
या अपघातात दुचाकीवरील कुमारी निकिता प्रसाद राऊत (वय ११) हिचा जागीच मृत्यू झाला. तर तिची आई सुचिता राऊत, वडील प्रसाद राऊत आणि लहान बहीण निधी (वय ६) हे जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, संबंधित ट्रक चालक प्रकाश बिजलबाई टोयटा (वय २६, रा. टंकारा, जि. मोरबी, गुजरात) हा टाईल्स व मार्बलचा जड माल घेऊन भरधाव वेगात वाहन चालवत होता. दुचाकीला धडक दिल्यानंतरही त्याने वाहन न थांबवता पुढे सुमारे ५०० मीटर अंतरावर जाऊन वळणावर नियंत्रण गमावले व ट्रक दगडावर आदळून पलटी झाला. या अपघातात चालक व क्लिनर विशाल टोयटा हेही जखमी झाले असून ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे.
या प्रकरणी निष्काळजीपणे वाहन चालवून सदोष मनुष्यवधास कारणीभूत ठरल्याप्रकरणी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला वैद्यकीय तपासणीनंतर ताब्यात घेण्यात आले आहे.
मृत मुलीचे शवविच्छेदन सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आले असून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण करीत आहेत.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण, हवालदार संतोष गलोले, मनीष शिंदे, रामदास कदम, ट्रॅफिक हवालदार मुंडे तसेच होमगार्ड जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य करत वाहतूक सुरळीत केली.



