सावंतवाडीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना जयंतीनिमित्त वैविध्यपूर्ण कार्यक्रमांनी अभिवादन.
- ✍️ मोहन जाधव
- सावंतवाडी: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती सावंतवाडी नगरपरिषद व बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज प्रबोधन समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने उत्साहात साजरी करण्यात आली. येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर परिसरात दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीने त्रिशरण व पंचशील ग्रहणाने झाली, तर समता सैनिक दलातर्फे मानवंदना देण्यात आली.
यानंतर झालेल्या अभिवादन सभेत पंचायत समिती सभापती सुस्मिता जाधव, नगराध्यक्ष श्रद्धाराजे भोंसले, उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसूजा, राष्ट्रीय किसान मोर्चा प्रभारी चंद्रकांत नागावकर, माजी नगराध्यक्ष संजू परब, संविधानिक हितकारणीचे जिल्हाध्यक्ष महेश परुळेकर, सावली फाउंडेशनच्या संस्थापक सावली पाटकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समन्वय समितीचे अध्यक्ष जगदीश चव्हाण होते.

- प्रास्ताविकात सचिव सगुण जाधव यांनी समितीच्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला, तर स्वागताध्यक्ष सद्गुरु जाधव यांनी मान्यवरांचे स्वागत केले. उपस्थित मान्यवरांचा शाल व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी नगराध्यक्ष श्रद्धाराजे भोंसले यांनी बाबासाहेबांच्या कार्याचा आढावा घेत त्यांच्या १९३२ मधील सावंतवाडी भेटीची आठवण करून दिली. “बाबासाहेबांचे कर्तृत्व डोळ्यासमोर ठेवूनच आपली सामाजिक वाटचाल सुरू आहे,” असे त्या म्हणाल्या. सभापती सुस्मिता जाधव यांनी “बाबासाहेबांचे कार्य हिमालयापेक्षाही उंच असून त्यांच्या विचारांमुळेच आपण प्रगतीपथावर आहोत,” असे सांगितले.
- यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, युवा नेते विशाल परब, उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.


उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी “संविधानामुळेच मला हे पद मिळाले,” असे नमूद करत बाबासाहेबांचे ‘शासनकर्ती जमात’ हे स्वप्न अधोरेखित केले. प्रमुख अतिथी चंद्रकांत नागावकर यांनी बाबासाहेबांचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी तरुणांनी चळवळीत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले. अध्यक्षीय समारोपात जगदीश चव्हाण यांनी संविधान हा सर्वोच्च ग्रंथ असल्याचे सांगत त्याचे जतन करण्याचे आवाहन केले.
दरम्यान, विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच रक्तदान केलेल्या रक्तदात्यांचा गौरव व भीमगीत गायन स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.
- https://youtube.com/shorts/1Z2LUa9FwrM
सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत तांबोळी येथील गायक अमित तांबोळकर यांनी ‘बुद्ध-शिव-फुले-शाहू-आंबेडकर’ यांच्यावर आधारित भीमगीतांची बहारदार मैफल सादर केली. सायंकाळी भव्य मिरवणुकीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
- Advertisement -
error: Content is protected !!