सावंतवाडी (प्रतिनिधी): निरवडे गावात सोमवारी (१३ एप्रिल) सायंकाळी साडेसहा ते सातच्या दरम्यान किरकोळ कारणावरून दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी उफाळून आली. या घटनेने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, दोन्ही गटांनी एकमेकांविरुद्ध सावंतवाडी पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्याने प्रकरण चिघळले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चेतन गोविंद गावडे (वय ३२, रा. निरवडे देऊळवाडी) यांच्या तक्रारीवरून लक्ष्मण मोहन गावडे, श्रीमती लक्ष्मण गावडे, शिवाजी सुरेश गावडे, चंद्र धारगळकर आणि सुनील सावंत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वादाच्या पार्श्वभूमीवर धमक्या देणे, शिवीगाळ करणे आणि लाकडी दांड्यांनी तसेच बुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामध्ये शिवाजी गावडे यांनी सिताराम लाडू गावडे यांच्या हाताला चावा घेतल्याची धक्कादायक बाबही समोर आली आहे.
दरम्यान, दुसऱ्या बाजूने श्रीमती लक्ष्मण गावडे (रा. निरवडे माळकरवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लाडू गावडे, सिताराम गावडे, चेतन गावडे, गुरुनाथ गावडे, उमाकांत गावडे आणि निलेश शिरोडकर यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आपल्या दीराला मारहाण होत असताना सोडवण्यासाठी गेलेल्या स्वतःलाही हाताने व लाकडी दांड्याने मारहाण झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
ही संपूर्ण घटना निरवडे-जिर बांबर परिसरात घडली असून, रात्री उशिरापर्यंत दोन्ही गटातील जखमींची वैद्यकीय तपासणी करून त्यानुसार गुन्हे नोंदवण्यात आले.
गावात भीतीचे वातावरण!
घटनेनंतर परिसरात तणाव वाढला असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. किरकोळ कारणावरून एवढा मोठा वाद उफाळल्याने गावात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
पोलीस तपास सुरू –
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे तसेच पोलीस हवालदार हनुमंत धोत्रे करत असून, दोन्ही बाजूंच्या आरोपींवर कडक कारवाई होण्याची शक्यता आहे.



