दुर्मिळ आजाराशी झुंजणाऱ्या चिमुकल्या तन्मयला मदतीचा हात! ; ‘सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान’ची माणुसकी जिंकली!
- रवी जाधव.
- सावंतवाडी : आयुष्याच्या अवघ्या नवव्या वर्षी दुर्मिळ आजाराशी झुंज देणाऱ्या चिमुकल्या तन्मय दळवीसाठी माणुसकीचा हात पुढे आला आहे. मुंबईतील वाडिया रुग्णालयात २७ तारखेला होणाऱ्या महत्त्वाच्या शस्त्रक्रियेसाठी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानकडून २० हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली असून, या मदतीमुळे दळवी कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे.
कु. तन्मय दळवी हा गंभीर आजाराने त्रस्त असून त्याच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे. आर्थिक अडचणींमुळे चिंतेत सापडलेल्या कुटुंबासाठी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान देवदूत ठरले. प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आलेल्या या मदतीने तन्मयच्या उपचारासाठी आशेचा किरण निर्माण झाला आहे.
यावेळी गांधी चौक येथील श्री गणेश स्टोअर्सचे व्यापारी जयप्रकाश बांदेकर यांनीही पुढाकार घेत तन्मयसाठी मदतीचा हात दिला. यापूर्वीही त्यांनी प्रतिष्ठानच्या रुग्णवाहिकेसाठी सहकार्य केले असून त्यांच्या सामाजिक जाणीवेचे कौतुक व्यक्त होत आहे.
“समाजात वावरताना सामाजिक भान जपणे हीच खरी जबाबदारी आहे. अशा दुर्मिळ आजाराने त्रस्त असलेल्या मुलांना मदत करून त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया होताना पाहणे, हे आमच्यासाठी समाधानाचे क्षण असतात,” असे भावनिक उद्गार संस्थेचे अध्यक्ष प्रा. सतीश बागवे यांनी काढले. “आजपर्यंत अनेक रुग्णांचे प्राण वाचवण्याचे भाग्य आमच्या प्रत्येक सदस्याला लाभले, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे,” असेही त्यांनी नमूद केले.
या संपूर्ण मदत कार्यात प्रतिष्ठानच्या सक्रिय सदस्या रूपा मुद्राळे यांचे मोलाचे योगदान असून त्यांच्या कार्याची विशेष दखल घेण्यात आली.
दरम्यान, आपल्या मुलासाठी मिळालेल्या या मदतीने भारावून गेलेल्या दळवी कुटुंबीयांनी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान व सर्व सहकार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार मानले. तन्मयच्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य फुलावे, यासाठी आता सर्वांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा त्याच्यासोबत आहेत.
या प्रसंगी तन्मय, त्याचे आई-वडील, प्रा. सतीश बागवे, शरदिनी बागवे, रूपा मुद्राळे, लक्ष्मण कदम व रवी जाधव उपस्थित होते.
- Advertisement -
error: Content is protected !!