सावंतवाडी : सावंतवाडीत भूमी अभिलेख कार्यालयातील भ्रष्टाचार पुन्हा एकदा उघडकीस आला असून, परिरक्षण भूमापक ओमकार सुरेंद्र आपटे (वय ३३) याला लाचेच्या रकमेसह पकडण्यात आले आहे. सामायिक जमिनीतील पोटहिस्सा मोजणीचे काम करून देण्यासाठी तब्बल २० हजार रुपयांची मागणी करत अखेर १० हजारांवर सौदा ठरवणाऱ्या या अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून जेरबंद केले.
तक्रारदाराने दोन महिन्यांपूर्वी जमीन मोजणीसाठी अर्ज केला होता. मात्र, शासनाचे काम वेळेत करण्याऐवजी आपटे याने “काम करायचे असेल तर पैसे मोजावे लागतील” असा अप्रत्यक्ष दबाव टाकत २० हजार रुपयांची उघड मागणी केली. तक्रारदाराने धाडस दाखवत लाचलुचपत विभागाकडे धाव घेतली.
पडताळणीदरम्यान मागणीची खात्री झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी सापळा रचला. तडजोडीअंती १० हजार रुपये स्वीकारताना आपटे रंगेहात पकडला गेला, आणि त्याच्या भ्रष्ट कारभाराचा पर्दाफाश झाला.
या प्रकरणी आपटे याच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ (सुधारित २०१८) च्या कलम ७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सामान्य नागरिकांच्या हक्काच्या कामासाठी लाच मागणाऱ्या अधिकाऱ्यांवर अशीच कठोर कारवाई होणे गरजेचे आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे.



