वेंगुर्ला : तळकोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध धार्मिक स्थळ असलेल्या श्री क्षेत्र रेडी येथील श्री गजानन देवस्थान, नागोळेवाडी येथे रेडी गणपतीचा ५० वा वाढदिवस सोहळा शनिवार, दिनांक १८ एप्रिल २०२६ रोजी अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा होणार आहे. सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त देवस्थानतर्फे दिवसभर विविध धार्मिक विधी आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची भव्य जय्यत तयारी करण्यात आली आहे.

उत्सवाची सुरुवात शनिवारी पहाटे ६:०० वाजता अभिषेकाने होणार असून, सकाळी ८:०० वाजता श्री सत्यविनायक महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी १२:३० वाजता महाआरती पार पडेल, त्यानंतर १२:४५ वाजता भाविकांना तीर्थप्रसादाचे वाटप केले जाईल. दुपारी १:०० ते ५:०० या वेळेत सर्व भाविकांसाठी महाप्रसाद (भंडारा) ठेवण्यात आला आहे.

संध्याकाळच्या सत्रात भक्ती आणि कलेचा सुरेख संगम अनुभवायला मिळणार आहे. दुपारी ३:०० ते रात्री ८:०० या वेळेत स्थानिक भजनी मंडळांकडून भजनांचा कार्यक्रम सादर होईल. सायंकाळी ५:०० वाजता ‘श्री गणेश माऊली संगीत ग्रुप’ प्रस्तुत ‘स्वर गणेश’ हा रंगतदार संगीताचा कार्यक्रम होणार आहे. तर रात्री ८:३० वाजता नाईक मोचेमाडकर दशावतार नाट्य मंडळाच्या पौराणिक दशावतारी नाट्यप्रयोगाने सोहळ्याची भव्य सांगता होईल.
या मंगलमय सोहळ्याचा लाभ घेण्यासाठी सर्व भाविकांनी सहकुटुंब, सहपरिवार उपस्थित राहावे, असे आवाहन श्री देव गजानन देवस्थान ट्रस्ट, रेडी तसेच नागोळेवाडी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.
कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी कृष्णाजी श्रीनिवास कामत, विनायक सदानंद कांबळी, संदेश सदानंद कांबळी तसेच समस्त देवस्थान समिती परिश्रम घेत आहेत.



