बंगळुरू : यंदाच्या आयपीएलच्या 19व्या हंगामातील 34व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आपला विजयरथ कायम राखत गुजरात टायटन्सवर 5 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. आपल्या घरच्या मैदानावर म्हणजेच एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर आरसीबीने फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही विभागात चमकदार कामगिरी केली. प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्सने युवा सलामीवीर साई सुदर्शन शानदार खेळीच्या जोरावर गुजरातने 20 षटकांत 3 बाद 206 धावांचा भक्कम डोंगर उभारला. पण विराट कोहली पुन्हा एकदा ‘चेस मास्टर’ ठरला. त्याने तुफानी फलंदाजी करत डाव सांभाळला आणि निर्णायक क्षणी फटकेबाजी करत संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेले. शेवटी आरसीबीने 5 विकेट्स राखून हा सामना जिंकत चाहत्यांना जल्लोषाची संधी दिली.
सुदर्शनचे तुफानी शतक –
गुजरात टायटन्सची सुरुवात कर्णधार शुभमन गिल आणि साई सुदर्शन यांनी केली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 128 धावांची भागीदारी रचली. सुदर्शन एका बाजूने आक्रमक फलंदाजी करत होता, तर गिलने संयमी खेळ करत साथ दिली. मात्र, सुयश शर्माने गिलला बाद करत ही जोडी फोडली. गिलने 24 चेंडूत 32 धावा केल्या. साई सुदर्शन शेवटपर्यंत ठाम उभा राहिला आणि आयपीएलमधील आपले तिसरे शतक पूर्ण केले. त्याने 57 चेंडूत शतक झळकावले.
अखेर जॉश हेझलवूड याने त्याला बाद केले. सुदर्शनने 58 चेंडूत 100 धावांची खेळी केली, ज्यात 11 चौकार आणि 5 षटकारांचा समावेश होता. यानंतर बटलरने 16 चेंडूत 25 धावा केल्या. शेवटच्या षटकांत वॉशिंग्टन सुंदर (12 चेंडूत नाबाद 19) आणि जेसन होल्डर (10 चेंडूत नाबाद 23) यांनी जोरदार फटकेबाजी करत गुजरातचा स्कोर 206 पार नेला.
विराटने दाखवला इंगा, चिन्नास्वामीवर आरसीबीचा शेवट गोड –
206 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीला सुरुवातीलाच धक्का बसला. विराट कोहली आणि जेकब बेथेल यांनी डावाची सुरुवात तुफीनी केली, पण मोठी भागीदारी उभी राहू शकली नाही. मोहम्मद सिराजने बेथेलला बाद करत आरसीबीला पहिला झटका दिला. बेथेलने 10 चेंडूत 14 धावा केल्या. यानंतर कोहलीला देवदत्त पडिक्कलची साथ लाभली आणि दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 115 धावांची भक्कम भागीदारी रचली. अखेर रशीद खानने पडिक्कलला बाद करत ही जोडी फोडली. पडिक्कलने 27 चेंडूत 55 धावांची तुफानी खेळी केली.
दरम्यान, कोहलीनेही आक्रमक फलंदाजी कायम ठेवत शानदार 81 धावांची खेळी साकारली. जेसन होल्डरने त्याला बाद केलं. कोहलीने 44 चेंडूत 8 चौकार आणि 4 षटकारांसह 81 धावा ठोकल्या. मात्र त्यानंतर आरसीबीचा डाव थोडा डगमगला. जितेश शर्मा 10 धावा करून पुन्हा राशिद खानचा बळी ठरला, तर मानव सुथारने कर्णधार रजत पाटीदारला 8 धावांवर माघारी धाडलं. शेवटी कृणाल पांड्या आणि टीम डेव्हिड यांनी शांतपणे डाव सावरत आरसीबीला विजय मिळवून दिला.
गुणतालिकेतील समीकरण बदलले –
या विजयासह आरसीबीचा फॉर्म जबरदस्त दिसत आहे. त्यांनी आतापर्यंत 7 पैकी 5 सामने जिंकले असून 10 गुणांसह गुणतालिकेत दुसरे स्थान पटकावले आहे. प्लेऑफच्या दिशेने त्यांची वाटचाल अधिक मजबूत झाली आहे. दुसरीकडे, गुजरात टायटन्ससाठी हा पराभव धक्कादायक ठरला. 7 पैकी फक्त 3 सामने जिंकलेल्या गुजरातचा संघ 6 गुणांसह सातव्या स्थानावर घसरला आहे. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आता त्यांना उर्वरित सामन्यांत सातत्यपूर्ण कामगिरी करावी लागणार आहे.



