सागर कारिवडेकरला तीन दिवसांची पोलिस कोठडी.

सावंतवाडी : शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवत कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या मोठ्या रॅकेटचा मुख्य सूत्रधार सागर सुबोध कारिवडेकर याला सावंतवाडी पोलिसांनी रविवारी उशिरा रात्री कारिवडे येथून अटक केली. तब्बल सहा महिन्यांपासून फरार असलेल्या या आरोपीला सोमवारी न्यायालयात हजर केले असता, त्याला २९ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
पुण्यातील शौनक सपकाळ यांच्या गाडीवर मुद्दाम धडक देत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या गंभीर गुन्ह्यातही कारिवडेकर मुख्य संशयित होता. या घटनेनंतर तो फरार झाला होता. मात्र, तो कारिवडे येथील सासरवाडीत येणार असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांना मिळताच, सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज शिंदे, महेश जाधव आणि महेश निरवडेकर यांच्या पथकाने सापळा रचून त्याला अटक केली.
कारिवडेकर याच्यावर खुनाचा प्रयत्नच नव्हे, तर ठाणे आणि मुंबई येथे मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. सचिन राणे आणि प्रिती राणे यांच्या साथीने त्याने शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली गुंतवणूकदारांना भरघोस परताव्याचे आमिष दाखवत कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी ठाणे नगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४), ३१६(२), ३(५) तसेच ‘महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम’ (MPID) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
दरम्यान, आरोपी फरार असतानाच ठाणे आर्थिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने सावंतवाडीत येऊन त्याच्या आलिशान बंगल्यावर कारवाई केली होती. बंगला बंद असल्याने कुलूप तोडून पंचनामा करण्यात आला आणि मालमत्ता जप्त करून बंगला सील करण्यात आला होता.
सावंतवाडीतील अनेक उच्चभ्रू व्यक्तींनाही या गुंतवणूक जाळ्यात ओढल्याचे समोर आले असून, खुनाचा प्रयत्न आणि आर्थिक फसवणूक या दोन्ही प्रकरणांचा सखोल तपास सुरू आहे. गुन्ह्यात वापरलेले मोबाईल व इतर महत्त्वाचे पुरावे हस्तगत करण्यासाठी पोलिसांनी कोठडीची मागणी केली होती, ती न्यायालयाने मान्य केली आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles