सावंतवाडी : विद्यार्थ्यांच्या आधुनिक व गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, नेमळे पंचक्रोशी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाला कोकण रेल्वे रत्नागिरीच्या सी.आर.एस. (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी) निधीतून ६५ इंची अत्याधुनिक स्मार्ट टीव्ही प्रदान करण्यात आला. या स्मार्ट टीव्हीचे उद्घाटन नेमळे पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आ. भि. राऊळ यांच्या हस्ते उत्साहात पार पडले.
या कार्यक्रमाला संस्थेचे नवनिर्वाचित सचिव पांडुरंग दळवी, सहसचिव महादेव राऊळ, मुख्य कार्यकारी अधिकारी रमाकांत प्रभूतेंडोलकर, ज्ञानेश्वर प्रभूखानोलकर, मदन राऊळ, विवेकानंद गावडे, श्रद्धा नाईक, विद्यालयाचे प्राचार्य आर. के. राठोड यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या स्मार्ट टीव्हीमुळे विद्यार्थ्यांना डिजिटल माध्यमातून शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध होणार असून, अध्यापन अधिक प्रभावी, आकर्षक आणि समजण्यास सुलभ होणार आहे. विशेषतः ऑनलाइन शैक्षणिक सामग्री, व्हिडिओ लेक्चर्स आणि प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडणार असल्याचे यावेळी मान्यवरांनी सांगितले.
या उपक्रमासाठी विद्यालयाचे माजी विद्यार्थी परशुराम राऊळ यांचे भावोजी विलास नाईक तसेच रत्नागिरी येथील प्रवीण देसाई यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या पुढाकारामुळेच ही सुविधा विद्यालयाला प्राप्त झाली, असे उपस्थितांनी नमूद केले.
कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेच्या व विद्यालयाच्या वतीने कोकण रेल्वे रत्नागिरीचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शिक्षण घेण्याची मोठी संधी उपलब्ध झाली असून, शिक्षणाच्या गुणवत्तेत नक्कीच सकारात्मक बदल होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.



