सावंतवाडी : झाराप–पत्रादेवी राष्ट्रीय महामार्गाला तब्बल १५ वर्षे पूर्ण होत आली, तरीही शेतकरी, त्यांची जनावरे आणि वन्य प्राणी यांच्यासाठी सुरक्षित पर्यायी मार्गाची कोणतीही व्यवस्था नसल्याने हा महामार्ग अक्षरशः मृत्यूचा सापळा ठरत असल्याची संतप्त प्रतिक्रिया स्थानिक शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
महामार्ग लोकवस्ती आणि जंगलालगत उभारण्यात आल्याने अनेक शेतकऱ्यांची भातशेती रस्त्याच्या पलीकडे राहिली आहे, तर काही ठिकाणी वाड्या आणि गावांच्या मधोमधच महामार्ग गेल्यामुळे नागरिकांना दररोज जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी परिस्थिती अधिकच भीषण बनते. अन्नाच्या शोधात वन्य प्राणी महामार्ग ओलांडताना सुसाट वेगातील वाहनांखाली येऊन दुर्मिळ प्रजातींचे प्राण जात असल्याच्या घटना वारंवार घडत आहेत.
महामार्गाखाली काही ठिकाणी बॉक्स सेल उभारण्यात आले असले, तरी त्या ठिकाणी जाण्यासाठी कोणताही सुरक्षित मार्गच नसल्याने त्यांचा उपयोग होत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. परिणामी, शेतात जाण्यासाठी किंवा जनावरे ने-आण करताना शेतकऱ्यांना थेट महामार्ग ओलांडण्याशिवाय पर्याय राहत नाही.

या प्रकल्पासाठी स्थानिकांनी आपल्या जमिनी कवडीमोलाने दिल्या. त्यावेळी महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी पर्यायी मार्ग व सुरक्षित मार्गिका देण्याचे आश्वासन मिळाले होते. मात्र आजपर्यंत निवेदने, आंदोलने करूनही या मागण्यांकडे संबंधित विभागाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे.
नेमळे ते मळगाव दरम्यान महामार्ग ओलांडताना आतापर्यंत ५० हून अधिक जणांनी आपला जीव गमावल्याचे सांगितले जात असून, ही संख्या धक्कादायक आहे. तरीही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ठोस उपाययोजना केल्या जात नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, नेमळे, मळगाव, वेत्ये परिसरातील शेतकऱ्यांनी वारंवार आंदोलने करून बॉक्स सेलपर्यंत पोहोचण्यासाठी सुरक्षित पर्यायी मार्ग उभारण्याची मागणी केली आहे. मात्र आमदार, खासदार, स्थानिक लोकप्रतिनिधी किंवा सामाजिक कार्यकर्त्यांनीही या गंभीर प्रश्नाकडे अपेक्षित लक्ष न दिल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
“आमच्या जमिनी गेल्या, आता जीवही जातोय… तरीही प्रशासन जागं होणार कधी?” असा थेट सवाल करत शेतकरी आता तीव्र आंदोलनाच्या तयारीत असल्याचे संकेत दिले आहेत.



