सावंतवाडी : अखिल भारतीय गंधर्व कला महाविद्यालयाच्या वतीने आयोजित पखवाज प्रारंभिक परीक्षेत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत यशाची नवी गाथा रचली आहे. सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी मिळवत शाळेचा नावलौकिक वाढवला आहे.
या परीक्षेत इयत्ता ७ वीतील कु. हेरंभ नाटेकर, इयत्ता ४ थीतील कु. श्रीहान मुंज तसेच इयत्ता ५ वीतील कु. वरद सावंत, कु. केवल मांद्रेकर आणि कु. कुशल तांडेल या पाचही विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट यश संपादन करत आपली कला सिद्ध केली.
या यशामागे विद्यार्थ्यांची जिद्द, सातत्यपूर्ण सराव आणि त्यांना लाभलेले मार्गदर्शक शिक्षक श्री. संकेत म्हापणकर यांचे मोलाचे मार्गदर्शन हेच यशाचे गमक ठरले.
विद्यार्थ्यांच्या या दैदिप्यमान यशाबद्दल शाळेचे संचालक श्री. रुजुल पाटणकर आणि मुख्याध्यापिका सौ. प्राची साळगावकर यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. तसेच त्यांच्या पुढील संगीत प्रवासासाठी शुभेच्छा देत, भविष्यातही अशाच यशाची परंपरा कायम राहील, असा विश्वास व्यक्त केला.



