कणकवली : शहरात सध्या अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाला असून, यामुळे शहराचे सामाजिक स्वास्थ्य पूर्णपणे धोक्यात आले आहे. उघडपणे सुरू असलेल्या या बेकायदेशीर जुगार, मटका, पट यामुळे तरुण पिढी चुकीच्या मार्गाला लागली असून, नागरिकांमधूब या अवैध धंद्यांना नक्की खतपाणी घालतंय कोण? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
शहरातील एका ‘गाव’च्या माळरानावर सध्या ‘डे’ मध्ये ‘पटाचा खेळ’ मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. धक्कादायक बाब म्हणजे, हे सर्व सुरू असताना तिथे जबाबदार असणारा व्यक्ती ‘तेज’ प्रकाशित करून आणि ‘प्रतीक’ दर्शवत जे प्रकार सुरू आहेत, तो सध्या सर्वसामान्यांसाठी एक मोठा ‘विनोद’ ठरत आहे. नावापुरता नियमांचा गाजावाजा करायचा आणि प्रत्यक्षात मात्र अवैध धंद्यांना मोकळे रान द्यायचे, हा प्रकार संतापजनक आहे.
कुटुंबे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर…
जुगार, सट्टा आणि पट, गांजा यासारख्या व्यसनांच्या विळख्यात शहरातील तरुण अडकत चालले आहेत. अनेक कुटुंबांची आर्थिक स्थिती खालावली असून पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक यंत्रणा या प्रकाराकडे डोळेझाक करत असल्याचा थेट आरोप देखील नागरिक करू लागले आहेत.
परशुराम उपरकरांच्या दाव्याकडे दुर्लक्ष?
यापूर्वी माजी आ. परशुराम उपरकर यांनी या संदर्भात खळबळजनक दावे केले होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ज्या ज्या ठिकाणी पट सुरू आहेत त्या त्या ठिकाणांची नावे देखील पत्रकार परिषद घेत उघड केली होती. त्यामुळे उपरकर यांच्या वक्तव्यामुळे प्रशासनाचे धाबे दणाणतील असे वाटले होते, परंतु प्रत्यक्षात परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने, पोलीस प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी नक्की कोणाच्या दबावाखाली काम करत आहेत? असा प्रश्न विचारला जात आहे.
कारवाई होणार की अर्थपूर्ण शांतता राहणार?
भरवस्तीत आणि माळरानावर सुरू असलेले हे ‘खेळ’ थांबवण्यासाठी आता जनतेचा संयम सुटत चालला आहे. संबंधित यंत्रणेने आतातरी गांभीर्याने लक्ष देऊन या प्रकरणाचा सूत्रधार ‘समाजाला कशाचे प्रतिक’ देत आहे हे शोधून काढावे आणि कणकवलीला या अवैध धंद्यांच्या विळख्यातून मुक्त करावे, अशी मागणी जोर धरत आहे.
पालकमंत्री नितेश राणे जिल्ह्याचे पालकमंत्री असले तरी कणकवली मतदारसंघाचे आमदार आहेत. काही महिण्याआधी त्यांनी कणकवली येथील एका मटका बुकीवर धाड टाकली होती. त्यामुळे वारंवार कणकवली तालुक्याचे नाव पटाच्या नकाशावर चढवणाऱ्या ‘प्रतिका”त्मक टोळीला गजाआड करतील का?, असा सवाल उपस्थित केला जात असून मटका बुकिंगवर झालेली कारवाई खरोखरच अवैध धंद्याना आळा घालण्यासाठी होती तर सुरू असलेल्या पटाच्या खेळाचा पर्दाफाश करतील का?, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.



