सावंतवाडी: तालुक्यातील माजगाव ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचपदाच्या अटीतटीच्या निवडणुकीत अखेर भाजपा महायुतीने विजयाचा झेंडा रोवला. महायुतीच्या उमेदवार रंजना रवींद्र कानसे यांनी अपक्ष उमेदवार जयश्री दिनेश सावंत यांचा तब्बल १५८ मतांनी पराभव करत दमदार विजय संपादन केला.
या निवडणुकीत एकूण ४०.११ टक्के मतदान झाले. ४१८५ मतदारांपैकी १६७९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये ७८२ महिला तर ८९७ पुरुष मतदारांचा सहभाग होता. निकालात कानसे यांना ८८२ मते मिळाली, तर सावंत यांना ७२४ मतांवर समाधान मानावे लागले.
या विजयामागे जिल्हा परिषद सदस्य व युवा नेते विक्रांत सावंत यांची रणनीती आणि नेतृत्व निर्णायक ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यांच्या प्रभावी नियोजनामुळे महायुतीने माजगावमध्ये आपले वर्चस्व सिद्ध केले असून हा विजय आगामी राजकीय समीकरणांसाठीही महत्त्वपूर्ण मानला जात आहे.



