विक्रांत सावंत : एक ध्येयवेडं धुरंधर युवा नेतृत्व अन् सावंत घराण्याच्या तेजस्वी परंपरेचा दिमाखदार वारसा! ; जनतेच्या विश्वासाची सुवर्णमुद्रा पुन्हा एकदा ठळक!

✍️ प्रा. रुपेश पाटील.
सावंतवाडी : सिंधुदुर्गच्या मातीत समाजकारण आणि लोकसेवेची ज्योत पेटवणारे, तत्त्वनिष्ठ आणि दूरदर्शी नेतृत्व म्हणून ज्यांचे नाव कोकणभर आदराने उच्चारले जाते ते म्हणजे महाराष्ट्र शासनाचे माजी मंत्री स्वर्गीय भाई सावंत. त्यांच्या कर्तृत्वाने सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यांत शिक्षणाची गंगा अवतरली; आरोग्यसेवेची भक्कम पायाभरणी झाली, हा केवळ इतिहास नाही, तर विकासाचा प्रेरणादायी अध्याय आहे.
या तेजस्वी परंपरेचा दीपस्तंभ पुढे नेण्याचे कार्य स्वर्गीय विकासभाई सावंत यांनी समर्थपणे केले. जिल्हा काँग्रेस अध्यक्ष म्हणून त्यांनी तळागाळातील जनतेच्या वेदना जाणून घेत त्या सोडविण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतले. सहकार क्षेत्रातील ‘बाप माणूस’ अशी ओळख निर्माण करत, शिक्षणतज्ज्ञ आणि दूरदर्शी प्रशासक म्हणून त्यांनी शिक्षण प्रसारक मंडळ, सावंतवाडी या प्रतिष्ठित संस्थेची धुरा दीर्घकाळ यशस्वीपणे सांभाळली.
नियतीच्या अटळ नियमाने विकासभाईंचे दुःखद निधन झाले, परंतु त्यांची विचारधारा आणि कार्यपद्धती नव्या उमेदीने पुढे नेण्यासाठी नियतीनेच जणू विक्रांत सावंत या युवा नेतृत्वाची निवड केली. अनुभवी दिग्गजांच्या साक्षीने आणि सर्वानुमते शिक्षण प्रसारक मंडळाची धुरा त्यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली, ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वावरच्या प्रगाढ विश्वासाची साक्षच!

        

काळाने दिलेल्या प्रत्येक संधीचे सोनं करत, विक्रांत सावंत यांनी अल्पावधीतच आपल्या नेतृत्वाचा ठसा उमटवला. माजगाव जिल्हा परिषद गटातून भारतीय जनता पक्षाच्या तिकीटावर त्यांनी मिळवलेला विक्रमी विजय हा केवळ राजकीय यश नव्हे, तर त्यांच्या दूरदृष्टी, नियोजनकौशल्य आणि जनसंपर्काच्या बळाचा जाहीरनामा ठरला. जिल्हा परिषदेत पदार्पण करताच शिक्षण समितीच्या सदस्यपदी झालेली निवड त्यांच्या अभ्यासू, शैक्षणिक दृष्टीकोनाची साक्ष देणारी ठरली.


माजगाव ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांच्या कल्पक आणि धुरंधर रणनीतीमुळे रंजना कानसे यांना मिळालेला विजय म्हणजे सावंत घराण्याच्या परंपरेने पुन्हा एकदा उंच भरारी घेतल्याचा क्षण! अनेक वर्षांपासून फडकणारा सत्तेचा झेंडा यावेळीही त्याच अभिमानाने डौलाने फडकताना दिसला.


‘विक्रांत सावंत’ हे नाव आज केवळ राजकारणापुरते मर्यादित राहिलेले नाही; तर ते जनतेच्या आशा-आकांक्षांचे प्रतीक बनले आहे. नेतृत्व, कर्तृत्व आणि दातृत्व या त्रिवेणी संगमाने नटलेले त्यांचे व्यक्तिमत्त्व अल्पावधीतच युवकांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांच्या मनाचा ठाव घेणारे ठरले आहे.

विधायक उपक्रमांची झंझावाती मालिका –
निवडून आल्यानंतर त्यांनी मतदारसंघातील प्रत्येक गाव, प्रत्येक वाडी-वस्ती गाठत जनतेच्या आशीर्वादाला कृतज्ञतेने वंदन केले. समस्यांच्या मुळाशी जाऊन त्या सोडवण्याची त्यांची धडपड इतरांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. रस्ते, मंदिरांचे सुशोभीकरण, पायाभूत सुविधा या सर्व क्षेत्रांत त्यांनी विकासाचा वेग वाढवला आहे.


शिवभक्ती त्यांच्या रक्तात भिनलेली! विद्यार्थ्यांना मोबाईलच्या आहारी जाण्यापासून वाचवत, त्यांनी शिवकालीन मर्दानी खेळ आणि युद्धकलेचे प्रशिक्षण वर्ग सुरू केले. संस्कार, शौर्य आणि स्वाभिमानाची शिदोरी देणारा हा उपक्रम भविष्याचा पाया मजबूत करणारा ठरत आहे. यासोबतच जिल्ह्यातून अधिकारी घडावेत यासाठी सुरू केलेल्या शिष्यवृत्ती परीक्षांमुळे अनेक स्वप्नांना नवे पंख लाभत आहेत.

सर्वपक्षीय मान्यता : एक दुर्मिळ ठेवा –
स्वर्गीय विकासभाईंच्या सर्वसमावेशक विचारांचा वारसा पुढे नेत, विक्रांत सावंत यांनी पक्षभेदाच्या पलीकडे जाऊन स्नेहसंबंधांची वीण अधिक घट्ट केली आहे. राणे परिवारापासून ते स्थानिक नेत्यांपर्यंत सर्वांशी त्यांनी निर्माण केलेले मैत्रीपूर्ण नाते त्यांच्या व्यापक स्वीकारार्हतेचे प्रतीक ठरते.
पालकमंत्री नितेश राणे, आमदार दीपक केसरकर, संजू परब, मनीष दळवी, रेश्मा सावंत, बबन साळगावकर, महेश सारंग, अशोक दळवी यांसह अनेक मान्यवर त्यांच्या कार्यशैलीने प्रभावित झालेले दिसतात—हीच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची खरी ताकद!
जात, पात, धर्म, पंथ, पक्ष यांच्या सीमारेषा ओलांडत, जिंदादिल, मितभाषी आणि सर्वांना आपलेसे करणारे अजातशत्रू व्यक्तिमत्त्व म्हणून विक्रांत सावंत आज उभे आहेत. त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी भाकीत करण्यासाठी कोणत्याही ज्योतिषाची गरज भासत नाही—कारण त्यांच्या कार्यातच त्यांच्या यशाचा आरसा स्पष्ट दिसतो.
निश्चितच, सावंत परिवाराचा हा तेजस्वी कुलदीपक भविष्यात राजकीय आणि सामाजिक आकाशात गगनभरारी घेईल, आणि कोकणच्या मातीतून उगवलेला हा तारा महाराष्ट्राच्या नकाशावर आपली अमिट छाप उमटवेल, असा ठाम विश्वास व्यक्त होत आहे.

विचारांचा समृद्ध वारसा, ज्ञानाची भक्कम पायाभरणी… आणि विनम्रतेचा अनुपम गंध!
विक्रांत सावंत यांना लाभलेला घराणेशाही वारसा हा केवळ राजकीय नसून तो सामाजिक, वैचारिक आणि शैक्षणिक समृद्धीने नटलेला आहे. उच्चविद्याविभूषित असलेले विक्रांत सावंत हे आपल्या ज्ञानसंपन्नतेने आणि अभ्यासू वृत्तीने प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहेत. समाजकारण, शिक्षण आणि राजकारण या तिन्ही आघाड्यांवर सावंत परिवाराचे नाव आजही आदराने आणि अभिमानाने घेतले जाते—हीच त्यांच्या परंपरेची खरी ओळख!
परंतु, यशाच्या शिखरावर झेपावत असतानाही त्यांच्या स्वभावात असलेली कमालीची साधेपणा आणि विनम्रता हीच त्यांची खरी ताकद ठरते. मोठेपणातही लहानपण जपणारे, पद-प्रतिष्ठेपेक्षा माणुसकीला अग्रक्रम देणारे हे व्यक्तिमत्त्व सर्वच स्तरातील नेत्यांच्या मनात विशेष स्थान निर्माण करून आहे.

याच सहजतेने आणि मनमोकळ्या स्वभावामुळे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब यांच्यासह अनेक दिग्गज नेते विक्रांत सावंत यांच्याबद्दल मनापासून आदर व्यक्त करताना दिसतात. त्यांच्या वागण्या-बोलण्यातली आपुलकी, साधेपणा आणि माणुसकीची जाणीव हीच त्यांना सर्वांच्या हृदयात घर करून देते.
मित्रांसाठी कोणत्याही क्षणी, कोणत्याही परिस्थितीत मदतीला धावून जाण्याची त्यांची वृत्ती ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील आणखी एक जमेची बाजू आहे. म्हणूनच युवाई त्यांना आपल्या माणसासारखे प्रेम करते, तर समाजातील मान्यवर व्यक्ती त्यांच्यावर तितक्याच आत्मीयतेने स्नेह वर्षाव करतात.
एकूणच, ज्ञान, विचार आणि विनम्रता यांचा सुंदर संगम असलेले विक्रांत सावंत हे केवळ एक युवा नेता नाहीत, तर नव्या पिढीसाठी प्रेरणादायी आदर्श ठरत आहेत!

सावंतवाडीचे अधिष्ठान श्री देव पाटेकर, श्री देव उपरलकर, ग्रामदेवता श्री देवी सातेरी आणि भगवान महादेव यांच्या कृपाछायेने युवाईचे आवडते आयडॉल विक्रांत सावंत यांच्या यशाची पताका अशीच उंचावत राहो!, हीच जनतेची मनःपूर्वक प्रार्थना!, विक्रांत यांच्या सोनेरी वाटचालीस हृदयपूर्वक हार्दिक शुभेच्छा!
✍️ प्रा. रुपेश पाटील.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles