सावंतवाडी : सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून सकाळीच सोशल मीडिया व वर्तमानपत्रांद्वारे राजवाडा परिसरातील जांभळांच्या झाडाखाली पडलेल्या जांभळांमुळे अपघात होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. मात्र प्रशासनाकडून तातडीने उपाययोजना न झाल्याने आज सायंकाळच्या पावसात आणखी एक गंभीर दुर्घटना घडली.
सायंकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास राजवाडा येथील जांभळाच्या झाडाखाली साचलेल्या जांभळांवर घसरून लॉरेन डिसोजा हे गंभीर जखमी झाले. या अपघातात त्यांच्या डोक्याला चार टाके पडले असून हात-पायही मोठ्या प्रमाणात जखमी झाले आहेत.
यावेळी सावंतवाडी नगरपरिषदेचे तत्पर, जनसामान्यांच्या मदतीला नेहमी धावून जाणारे लोकाभिमुख नगरसेवक सुधीर आडिवरेकर यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेत जखमींना मदत केली. स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने त्यांनी तत्काळ रुग्णालयात दाखल करण्याची व्यवस्था करून सामाजिक बांधिलकीचे उत्कृष्ट उदाहरण पुन्हा एकदा दाखवून दिले.
विशेष म्हणजे, कालही अशाच पावसाळी परिस्थितीत चार अपघात घडले होते. त्यामुळे ही बाब अत्यंत गंभीर बनली असून नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव यांनी नगरपरिषद प्रशासनाला पुन्हा एकदा विनंती करत सांगितले की, “राजवाडा परिसरातील जांभळांच्या झाडाखाली पडलेली जांभळे तात्काळ स्प्रेने पाणी मारून साफ करण्यात यावीत, अन्यथा भविष्यात आणखी गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.”



