पूर्वीच्या शाळा म्हणजे केवळ इमारती नव्हत्या तर खऱ्या अर्थाने संस्कारांची ज्ञानमंदिरे! : दिलीप बेतकेकर यांचे प्रेरणादायी प्रतिपादन. ; कुडासे येथील सरस्वती विद्यामंदिराच्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन उत्साहात.

दोडामार्ग: तालुक्यातील कुडासे येथील सरस्वती विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेजच्या माजी विद्यार्थी संघाच्या वार्षिक स्नेहसंमेलनात जुन्या शिक्षणपद्धतीतील संस्कारमूल्यांचा जागर करताना विद्याभारतीचे ज्येष्ठ कार्यकर्ते व समुपदेशक दिलीप बेतकेकर यांनी “पूर्वीच्या शाळा या नुसत्या इमारती नव्हत्या, तर त्या विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार देणाऱ्या खऱ्या अर्थाने ज्ञानमंदिर होत्या,” असे भावनिक आणि प्रेरणादायी उद्गार काढले.
कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना त्यांनी सांगितले की, त्या काळात आजच्या सारख्या भौतिक सुविधा नसल्या तरी विद्यार्थ्यांना जीवनाचा खरा अर्थ समजावून सांगणारे गुरुजन होते. शिक्षणासोबत संस्कारांची जोड देणारी ती शिक्षणपद्धती विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी अत्यंत महत्त्वाची ठरली. “आजच्या पिढीला मूल्यशिक्षणाचे धडे आणि शुद्ध आचरण दिल्यास त्यांची ऊर्जा सकारात्मक दिशेने वळू शकते,” असेही त्यांनी नमूद केले.
माजी विद्यार्थी संघाचे सचिव दत्तप्रसाद देसाई यांनी संघाच्या माध्यमातून सुमारे अठरा लाख रुपयांचा निधी उभारून शाळेसाठी विविध भौतिक सुविधा निर्माण करण्यात आल्याची माहिती दिली. भविष्यातही शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी माजी विद्यार्थी संघ अधिक जोमाने कार्यरत राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
संघाचे पदाधिकारी दादा देसाई तसेच अध्यक्ष संदेश तळणकर यांनी पालक, शिक्षक आणि दाते यांच्या सहकार्यामुळे शाळेने गुणवत्तेत आपले वेगळे स्थान निर्माण केले असल्याचे सांगितले. बारावी विज्ञान शाखेचा शंभर टक्के निकाल आणि माध्यमिक परीक्षेतील उल्लेखनीय यशाचा त्यांनी विशेष उल्लेख केला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते व माजी विद्यार्थी अँड. नकुल पार्सेकर यांनी आपल्या मनोगतात जुन्या आठवणींना उजाळा दिला. “पंचेचाळीस वर्षांपूर्वी या शाळेत शिकत असताना अनुभवलेला संघर्ष आणि परिस्थितीशी झुंज देण्याची मानसिकता आजच्या आयुष्यात उपयोगी पडली. व्यक्तिमत्त्व विकासाचा पाया या शाळेनेच घातला,” असे सांगत त्यांनी शाळेच्या भविष्यातील नव्या संकल्पनांसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी प्रकाश कुडासकर, संतोष देसाई, रामदास मेस्नी, नंदकिशोर नाईक, सौ. तळणकर आदी माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन सचिव दत्तप्रसाद देसाई यांनी केले तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक जालिंदर शेंडगे यांनी मानले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles