कुडाळ : आजच्या लोकल वॉर्मिंगच्या युगात केवळ वृक्ष लागवड करून चालणार नाही, तर संपूर्ण पर्यावरणाचे संवर्धन व जतन ही काळाची गरज आहे. केवळ फोटो काढण्यासाठी वृक्षारोपण न करता, लावलेले प्रत्येक झाड जगवण्याची जबाबदारी आपण घेतली पाहिजे. निसर्गाचे चक्र बिघडल्याने आज हवामान बदलाचे संकट उभे ठाकले आहे.यावर मात करण्यासाठी शाश्वत विकास आणि पर्यावरण रक्षण यांचा समतोल राखणे आवश्यक आहे.प्रत्येक नागरिकाने किमान एक झाड दत्तक घेऊन ते मोठे होईपर्यंत जोपासावे,तरच आपली वसुंधरा सुरक्षित राहील, असे प्रतिपादन माजी शालेय शिक्षण मंत्री आ.दीपक केसरकर यांनी केले.
तत्कालीन पर्यटनमंत्री नारायण राणे यांनी ३० एप्रिल १९९७ रोजी ‘सिंधुदुर्ग पर्यटन जिल्हा’ म्हणून अधिकृत रित्या घोषित केला होता.या ऐतिहासिक निर्णयाच्या पार्श्वभूमीवर आणि सिंधुदुर्गाच्या समृद्ध निसर्गसंपदेचा जागर करण्यासाठी नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या वतीने आयोजित ‘५ वे राष्ट्रीय पर्यावरण व पर्यटन संमेलन २०२६’ कुडाळ येथे रविवार दि १० मे रोज मोठ्या उत्साहात ‘जय वासुदेवानंद हॉल’ येथे मोठ्या उत्साहात पार पडले.
या संमेलनाचे उद्घाटन माजी शालेय शिक्षण मंत्री आ.दीपक केसरकर,जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत,संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदर्श महाराष्ट्र भूषण सन्मानित सुयोग धस,देवगड नगरपंचायत सभापती तन्वी चांदोस्कर,राष्ट्रीय महिला सचिव आशिया रिझवी,राष्ट्रीय खजिनदार सौ.अपर्णा धस, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बादल बेले, गोवा राज्य अध्यक्ष जोवेल डिसिल्व्हा, राज्य सचिव बापू परब, जिल्हा संघटक संजय पिळणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदर्श महाराष्ट्र भूषण सुयोग धस होते.

वाढते प्रदूषण आणि हवामान बदल यामुळे निसर्गाचा समतोल बिघडला आहे.निसर्ग टिकला,तरच मानव टिकेल.त्यामुळे झाडे लावणे, पाण्याचा काटकसरीने वापर करणे आणि प्रदूषण रोखणे ही आजच्या काळाची मोठी गरज आहे.आपली पृथ्वी वाचवण्यासाठी निसर्ग संवर्धन ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, असे मत यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी व्यक्त केले.
संमेलनाची सुरुवात वृक्षदिंडी प्रमुख संजय पिळणकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून सकाळी ७:३० वाजता कुडाळ पोलीस स्टेशन ते संमेलन स्थळ अशा भव्य ‘वृक्षदिंडी’ने झाली.त्यानंतर सकाळी १०:१५ वाजता संमेलनाचे उद्घाटन दीपप्रज्वलननाने व वृक्ष पूजनाने झाले.
यावेळी गड किल्ले संवर्धन समिती सिंधुदुर्गचे जिल्हा अध्यक्ष गणेश नाईक यांच्या शिवकालीन साहित्य प्रदर्शनाचे,तसेच मालवण येथील पिटर शेरॉन यांच्या गडकिल्ले तैलचित्र प्रदर्शनाचे व प्रकाश कदम यांच्या निसर्ग फोटो गॅलरीचे उद्घाटनही उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी ऋतूजा गवस यांच्या स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठांचे व सावंतवाडी येथील सुधीर पराडकर यांनी तब्बल ७७ वेळा रक्तदान केल्याबद्दल,बांदा येथील पत्रकार व रक्तमित्र निलेश मोरजकार यांचा २४ वेळा रक्तदान केल्याबद्दल, वेंगुर्ला येथील जि प मुख्याध्यापिका सौ शामल शंकर मांजरेकर – पिळणकर यांचा ९ वेळा रक्तदान केल्याबद्दल,गर्भवती महिलेचे प्राण वाचविल्याबद्दल वेंगुर्ला येथील डॉ.पांचाळ व १०८ चालक साईसिद्धी मेस्त्री,सर्पमित्र प्रसन्ना गंगावणे,कार्मिस अल्मेडा व ज्ञानेश्वर रेडकर,यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांना विशेष सन्मानित करण्यात आले.
यावेळी पर्यावरण संवर्धन, पर्यटन विकास आणि हवामान बदल यांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.या संमेलनात महाराष्ट्र व गोवा राज्यातील पर्यावरण प्रेमी,प्राणी मित्र,सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक संजय पिळणकर तर सुत्रसंचालन ऋतुजा गवस,संजय पिळणकर व आभार बापू परब यांनी मानले



