सावंतवाडी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील बांदा येथील नव्याने उभारण्यात आलेल्या उड्डाण पुलाला तडे गेल्याचा गंभीर आरोप करत या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून संबंधित कंत्राटदार तसेच जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी माहिती अधिकार महासंघ महाराष्ट्र राज्य संपर्क संघटक तथा सावंतवाडी तालुका प्रमुख श्री. सुशील रघुनाथ चोगुले यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी राष्ट्रीय महामार्ग उपविभाग, सावंतवाडी कार्यालयाचे उपविभागीय अभियंता यांना दिले आहे.


दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे की, राष्ट्रीय महामार्ग अधिनियम १९५६ तसेच भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिनियम १९८८ अंतर्गत एनएचएआयमार्फत करण्यात येणाऱ्या रस्ते व उड्डाण पुलांच्या कामांमध्ये गुणवत्तेची विशेष काळजी घेणे आवश्यक असताना बांदा उड्डाण पुलाच्या कामामध्ये गंभीर त्रुटी आढळून आल्याचा आरोप करण्यात आला आहे. पुलाला मोठ्या प्रमाणात तडे गेल्याने या कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून यामुळे भविष्यात अपघाताचा धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे.
तसेच संबंधित पुलाची तात्काळ पाहणी करून वस्तुस्थिती अहवाल तयार करण्यात यावा, तसेच पुलाचे काम करणाऱ्या कंत्राटदारासह संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करून योग्य ती प्रशासकीय कारवाई करावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.
या संदर्भातील केलेल्या कारवाईचा अहवाल सात दिवसांच्या आत सादर करावा, अन्यथा वरिष्ठ कार्यालयाकडे दाद मागण्यात येईल, असा इशाराही श्री. चोगुले यांनी दिला आहे.
दरम्यान, या तक्रारीमुळे मुंबई-गोवा महामार्गावरील कामांच्या गुणवत्तेबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होत असून स्थानिकांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.



